जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

टीम ई-सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच दिल्ली ट्रान्सपोर्टची बस पेटवून दिली. यात एक पोलिस आणि अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.

नवी दिल्ली :  नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्याला ईशान्येकडील राज्यांमधून तीव्र विरोध होत आहे. आज, या कायद्या विरोधातील आंदोलनाची धग दिल्ली बसली. दिल्लीत दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात आज, कॅब विरोधात हिंसक आंदोलन झाले. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात काही आंदोलनकर्ते तर काही पोलिसही जखमी झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी विद्यार्थ्याांच्या आंदोलनात 12 पोलिस जखमी झाले होते. शनिवारपासून या आंदोलनाची धग आणखी वाढली. आंदोलक आणि पोलिस दक्षिण दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत आमने-सामने आले होते. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच दिल्ली ट्रान्सपोर्टची बस पेटवून दिली. यात एक पोलिस आणि अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. यावरून आता आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस सायमन फारूकी याने पोलिसांवर आरोप केला आहे. आंदोलक शांततेने मथुरा रोडवर आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात चकमक झाली, असा आरोप फारुकी यांनी केलाय. 

आणखी वाचा - आंदोलकांचे कपडे पाहा; मोदी विरोधकांवर भडकले

आमचा संबंध नाही : विद्यार्थी संघटना 
दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने आमचा या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर होते, असा आरोप केला आहे. तसेच हे आंदोलन हिंसक वळण घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पसमध्ये परतले आहेत. त्यामुळे या आंदोलनाशी आमचा संबंध नाही, असे विद्यार्थी संघटनेने सांगितले आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनानेही विद्यापीठ आणि आतील विद्यार्थ्यांचा यात सहभाग नसल्याचे म्हटले आहे. आंदोलन विद्यापीठाच्या बाहेर सुरू असून, त्यात स्थानिकांचा सहभाग असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे कसलेही समर्थन होणार नाही. कोणीही हिंसाचार करू नये. आंदोलन हे शांततेतच व्हायला हवे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anti cab protest gets violent near jamia millia islamia university