गाव माझं वेगळंः ट्रकची बांधणी करणारे गाव निलजी

गाव माझं वेगळंः ट्रकची बांधणी करणारे गाव निलजी

निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी ट्रकची ‘बेळगाव बॉडी’ तयार करण्यात निलजीकरांचा सिंहाचा वाटा आहे. 

बेळगावपासून सहा किलोमीटरवर वसलेल्या निलजीत १२०० एकर जमीन असून ६०० एकर गावठाण आहे. निलजी लहान, त्यामुळे शेतीही कमी. सहा महिने काम आणि इतरवेळी बांधकाम व्यवसायात मिळणाऱ्या मजुरीवर ४० च्या दशकात गावातील बहुतेक तरुण आपला संसार करीत. गावातीलच युवक नारायण मोदगेकर मैल दगड रंगवत. त्यातून ट्रक व्यावसायिकांशी ओळख झाली. त्यातून ट्रक पेंटिंगचे काम मिळाले. १९५० च्या दशकात नारायण यांनी धारवाड रोडवर (जुना पी. बी. रोड) शिवाजी कंपाउंडमध्ये आपला पहिलावहिला ट्रक बॉडी बिल्डिंगचा व्यवसाय थाटला. 

गावात ट्रक बॉडी बिल्डर वाढल्याने १९७५ मध्ये ट्रकला लागणारे पत्रे, नटबोल्ड, अँगल, रंग पुरवठा सुरू केला. याच व्यवसायात वाढलो. आज माझा मुलगा व्यवसाय पुढे चालवत आहे. 
- रामचंद्र मोदगेकर,

जिल्हा पंचायतचे माजी सदस्य, निलजी

हरिकाका कंपाऊंडमध्ये माझे काका ट्रक बॉडी बिल्डिंग करतात. वडिलांचा व्यवसाय काकतीमध्ये आहे. मी ट्रकसाठी रंग पुरवितो. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे ट्रकसाठी हवा तो रंग मी तयार करून पुरवू शकतो. पूर्वीपासूनच आमचा ट्रकबांधणीचा व्यवसाय आहे. 
- अमर पाटील,
रहिवासी, निलजी
 

परंतु, हाच व्यवसाय पुढे निलजी गावाला वेगळी ओळख देणारा ठरला. नारायण यांनी गावातील इतर युवकांना आपल्याकडे कामाला आणले. ते करतानाच त्यांनी शिवाजी कंपाऊंडमध्ये इतर बॉडी बिल्डरांकडेही गावातील युवकांना कामाला लावले. त्यांची ती दूरदृष्टीच होती.

व्यवसायात प्रगती झाल्यानंतर त्यांनी निलजीच्या साथीदारांबरोबर धारवाड रोडवरच महाकला कंपाऊंड सुरू केले. निलजीतील युवकांचा बॉडी बिल्डर म्हणून भरणा असलेले हे स्वतंत्र कंपाऊंड ठरले. १९६० च्या दरम्यान हा व्यवसाय सुरू झाला. केवळ दहा वर्षांच्या कालावधीत ही प्रगती होती. सुमारे २५ नवी गॅरेज येथे वसली. सर्व मालक निलजीचे होते. त्यानंतर माणिकबाग कंपाऊंडमध्येही गावकऱ्यांनी जम बसविला. त्यामुळे ७० च्या दशकात निलजीतील प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डर जन्माला आला. 

केवळ ट्रक बांधणीचेच काम युवकांनी केले नाही, तर अत्यावश्‍यक साहित्य पुरविणे, त्याची निर्मितीही हाती घेतली. निलजी गावात ५०० कुटुंबे होती. पैकी अधिकाधिक लोक यात गुंतले. त्याकाळी डीसीसी बॅंकेपासून खासबागपर्यंतच्या धारवाड रोडवर निलजीच्या युवकांनी व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले.

बेळगाव बॉडी फेमस ः 
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील ट्रक मालक येथे ट्रकची बॉडी बनविण्यासाठी येतात. त्यामुळे तिन्ही राज्यांतील ट्रकच्या बॉडीला ‘बेळगाव बॉडी’ या विशेष नावाने ओळखले जाते. यामध्ये आंध्र, केरळ, तमिळनाडूचा समावेश नाही. कारण त्यांच्या ट्रक बॉडी विशेषरूपाने वेगळ्या आहेत.

महाराष्ट्रात अन्यत्रही निलजीकर
तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कार्यकाळात मंदी आल्याने ट्रक बांधणीच्या व्यवसायावर संकट आले होते. निलजीतील बहुतेकांना व्यवसाय बंद करावा, असे वाटू लागले. परंतु, तो व्यवसाय बंदऐवजी अन्यत्र सुरू करण्याचा निर्णय काहींनी घेतला. त्यामुळे आज कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुण्यातील आळेफाटा व चाकण, सोलापूर, नगर, धुळे येथे निलजीकरांचे स्वतःचे ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसाय आहेत. आजही त्यांची गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही. 
स्थलांतर 

नवा सुवर्ण चतुष्कोण राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यानंतर काहींनी व्यवसाय धारवाड रोडवरून गांधीनगर येथे स्थलांतरित केला. व्यवसाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर गांधीनगरपासून अलारवाड क्रॉसपर्यंत विस्तारित झाला. निलजीकरांचे येथील हरीकाका कंपाऊंडही आपली विशेष ओळख ठेवून आहे. 

आर्थिक उलाढाल 
येथे स्थायिक असलेले १२०० लोक ट्रक बॉडीच्या व्यवसायात आहेत. ६० ट्रक बॉडी बिल्डर असून, प्रतिमहिना एका बिल्डरकडे किमान दोन ट्रक बांधतात. सरासरी प्रत्येक महिन्याला चार कोटी २० लाख रुपयांचा व्यवसाय ट्रक बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून ते करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com