राजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

- पुन्हा विक्रमसिंघेंचा राज्याभिषेक होणार
- श्रीलंकेतील राजकीय पेच संपुष्टात 

कोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनीच राजपक्षे यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. आता राजपक्षे यांच्याऐवजी रानिल विक्रमसिंघे पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे.

श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांमुळे राजपक्षे यांचे सत्तास्वप्न भंगले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना राजपक्षे समर्थक खासदार शिहान सिमासिंघे म्हणाले, की कोलंबोतील विजेरामा येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमातच राजपक्षे यांनी राजीनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याची माहिती देखील त्यांनी "युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्स'च्या खासदारांना दिली आहे.

तत्पूर्वी 26 ऑक्‍टोबर रोजी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनीच राजपक्षे यांची पंतप्रधानपदी निवड करत विक्रमसिंघे यांना पदच्युत केले होते, यामुळे श्रीलंकेमध्ये नवा घटनात्मक पेच निर्माण झाला होता. हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने सरकारच्या संसद विसर्जित करण्याच्या कृत्याला बेकायदा घोषित केले होते. तसेच या संदर्भात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला होता. 

Web Title: Sri Lankan PM Mahinda Rajapaksa resigns