श्रीनगरमध्ये 'बीएसएफ'च्या छावणीवर हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

तीन दहशतवाद्यांचा खातमा; सहायक उपनिरीक्षक हुतात्मा

श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज बडगाम जिल्ह्यातील हमहामा परिसरात श्रीनगर विमानतळाला लागून असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीस दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक बी.के यादव हुतात्मा झाले असून, अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवाद्यांनी आज पहाटे साडेचारच्या सुमारास "बीएसएफ'च्या छावणीवर हल्ला केला, सुरक्षेचे अभेद्य कडे भेदत दहशतवादी आतपर्यंत पोचले होते, यावेळी त्यांनी ग्रेनेड हल्ला ही केला अशी माहिती सूत्रांनी दिली. हल्लेखोर हे छावणीतील प्रशासकीय विभागापर्यंत पोचल्यानंतर "सीआरपीएफ' आणि पोलिसांनी त्यांना रोखून धरले त्यानंतर सीमा सुरक्षा दलाचे जवान मैदानात उतरले. अंदाजे तासभर ही चकमक सुरू होती. या हल्ल्यानंतर विमानतळ आणि शेजारील रस्त्यांवरील वाहतूक रोखण्यात आली होती. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हल्ल्याचे वृत्त समजताच तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हे दहशतवादी विमानतळावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले नव्हते, माध्यमांनी सुरवातीस विमानतळावर हल्ला करण्यात आल्याचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले होते, असे काश्‍मीरचे पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले.

आणखी हल्ल्याची शक्‍यता
"जैशे महंमद'चे काही दहशतवादी आणखी आत्मघाती हल्ले घडवून आणण्याची शक्‍यता असून, त्यांना आपल्याला सामोरे जावेच लागेल. पाकिस्तानचा शेजार असेपर्यंत असे हल्ले होतच राहतील, असेही मुनीर खान यांनी नमूद केले. या हल्ल्यानंतर हमहमा परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. "बीएसएफ'च्या ज्या 182 व्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला ती तुकडी श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीच्या संरक्षणाचे काम करते.

गोळीबारात जवान हुतात्मा
पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूँच जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कराच्या चौक्‍यांना लक्ष्य केले. कृष्णा घाटी सेक्‍टरमध्ये पाकच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले नायक महेंद्र चेमजंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतानेही सडेतोड उत्तर दिल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याने सीमेवरील लष्कराची गस्त वाढविण्यात आली आहे.

Web Title: srinagar news In Srinagar, the BSF camp was attacked