श्रीनगर पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचारात सहा ठार

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

पॅलेट गन नसल्याने बंदुकीचा वापर 
केंद्रांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडे पॅलेट गन नसल्याने त्यांनी त्यांच्याकडील बंदुकांमधून गोळ्या झाडल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरमधील एकूण बारा मतदान केंद्रांवर हिंसाचार झाला. मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांवरही आंदोलकांनी हल्ला केला. हिंसाचारामुळे बडगाम जिल्ह्यातील 70 टक्के केंद्रांवरील निवडणूक अधिकारीच पळून गेले होते. 

श्रीनगर - लोकसभा पोटनिवडणुकीवेळी विविध मतदान केंद्रांवर हिंसक जमावावर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. हिंसाचारामुळे येथे केवळ 6.5 टक्के मतदान झाले होते.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानप्रक्रिया सुरू असताना विविध केंद्रांवर आक्रमक जमावाने दगडफेक केली आणि पेट्रोल बॉंबचा मारा करत केंद्र जाळण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे येथे लष्करालाही पाचारण करावे लागले. गंदेरबल, पाखेरपोरा या भागांमध्ये नागरिकांनी मतदान केंद्रांची नासधूस केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरवातीला हवेत गोळीबार केला होता. मात्र, त्याचा परिणाम न झाल्याने लष्कराला बोलवावे लागले, असे सूत्रांनी सांगितले. येथे झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले. यापैकी महंमद अब्बास (वय 20) आणि फैझान राठर (वय 15) या मुलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याशिवाय रक्‍सौना बीरवाह येथे निसार अहमद आणि दौलतपुरा येथे शाबीर अहमद यांचा गोळीबारात मृत्यू झाला. चांदुरा आणि मेगाम या गावांमध्येही गोळीबारात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

मतदानप्रक्रिया नीट राबविता न आल्याबद्दल विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर टीका केली आहे. फारूख अब्दुल्ला हे या निवडणुकीत उमेदवारही आहेत. 

पॅलेट गन नसल्याने बंदुकीचा वापर 
केंद्रांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडे पॅलेट गन नसल्याने त्यांनी त्यांच्याकडील बंदुकांमधून गोळ्या झाडल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरमधील एकूण बारा मतदान केंद्रांवर हिंसाचार झाला. मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांवरही आंदोलकांनी हल्ला केला. हिंसाचारामुळे बडगाम जिल्ह्यातील 70 टक्के केंद्रांवरील निवडणूक अधिकारीच पळून गेले होते. 

Web Title: Srinagar polling turnout poor at 6.5% as violence kills 6