मोदी जेटलींबरोबर काम करतात तरी कसे?:स्वामी

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. 

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मी अर्थमंत्र्यांच्या कामावर नाराज आहे. पंतप्रधान त्यांच्यासोबत कसे काम करतात, हे त्यांनाच माहीत, असे स्वामी यांनी म्हटल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. यावेळी भारत टॅक्स हेवन होऊ शकतो की नाही हे विचारले असता स्वामी म्हणाले की, गेल्या काही काळात देशाची अर्थव्यवस्था ज्या दिशेने जात आहे, ते पाहता प्राप्तिकर विभाग बंद करायला पाहिजे आणि करदात्यांना रस्ते बांधण्याच्या कामाला जुंपायला पाहिजे.

यापूर्वीही अरूण जेटली परदेश दौऱ्यावर स्वामींनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. यानंतर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त करीत स्वामींनी स्वतःला लगाम देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. 

स्वामींनी या कार्यक्रमादरम्यान सर्जिकल स्ट्राइक, समान नागरी कायद्याविषयीदेखील आपली मते व्यक्त केली. याशिवाय, उत्तर प्रदेशातील निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत कायदा सुव्यवस्था आणि राम मंदीर या दोन मुद्द्यांना विशेष महत्त्व येईल. याशिवाय, कोणत्याही पक्षाला केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक जिंकणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे उदाहरण दिले. नरसिंह राव यांच्या काळात देशाचा सर्वाधिक विकास झाला, परंतु पुढील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकारदेखील 2004 साली विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक जिंकू शकले नव्हते याची त्यांनी आठवण करुन दिली.

Web Title: Subramanian Swamy hits out at Arun Jaitley again