भाजप खासदारच म्हणाला,'मी नाही देणार वेतन'

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

‘मी संसदेत नियमित जात होतो, पण संसदेतील गोंधळामुळे कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी चूक नाही. मी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असल्याने जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार देणार  नाही,'': स्वामी

नवी दिल्ली: संसदेच्या गेले तेवीस दिवस चाललेल्या कोंडीस कॉंग्रेस जबाबदार आहे आणि त्यामुळे भाजप व भाजप आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष या 23 दिवसांचा पगार व भत्ते घेणार नाहीत, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी नुकतेच जाहीर केले. मात्र भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांना पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रपती जोपर्यंत सांगत नाही तो पर्यंत मी माझा पगार देणार नाही असे स्वामींनी सांगितले. 

‘मी संसदेत नियमित जात होतो, पण संसदेतील गोंधळामुळे कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी चूक नाही. मी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असल्याने जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार देणार  नाही,'' असे स्वामी म्हणाले.  स्वामींनी घेतलेल्या निर्णयामुळे मात्र भाजपची आता पंचाईत झाली आहे. 

अनंतकुमार यांनी  उशिरा अचानक व घाईघाईने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भाजप व भाजप आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष 23 दिवसांचा पगार व भत्ते घेणार नसल्याचा निर्णय जाहीर केला.  मात्र या निर्णयासंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची या संदर्भात बैठकही झालेली नाही त्यामुळे भाजपतर्फे परस्पर करण्यात आलेल्या या निर्णयात शिवसेना सहभागी नाही असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनंतकुमार यांनी अचानक घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गेले 23 दिवस सुरू असलेल्या संसदीय कोंडीस कॉंग्रेसला सर्वस्वी जबाबदार धरले. कॉंग्रेसच्या या लोकशाहीविरोधी आचरणामुळे संसदेत ही कोंडी झालेली आहे आणि त्यामुळेच कामकाज बंद पडले आहे असे त्यांनी सांगितले. 

कॉंग्रेस पक्ष हा अत्यंत असहिष्णू पक्ष आहे. ते नकारात्मक राजकारण करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो प्रचंड जनादेश मिळाला आहे ती बाब कॉंग्रेसच्या पचनी पडणे अशक्‍य होत असल्याने ते या प्रकारचे असहिष्णू व नकारात्मक राजकारण करीत असल्याचा आरोप अनंतकुमार यांनी केला. संसदेचे कामकाज या गोंधळामुळे होत नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या कालावधीतील पगार किंवा भत्ते घेणे औचित्याला धरून होणार नाही, अशी भाजपची व भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांची भूमिका आहे. त्यामुळेच या काळातील पगार व भत्ते न घेता तो पैसा पुन्हा जनतेलाच अर्पण करण्याचे भाजप व मित्रपक्षांनी ठरवले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र, भाजपच्या या निर्णयात सहभागी होण्याची बाब शिवसेनेने साफ फेटाळून लावली. 

 

Web Title: Subramanian Swamy refuses to forgo salary