
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अहमदाबाद शहराचे नामांतर कर्णावती न करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवले होते. आता ते स्वत:च त्याबद्दल उदासीन आहेत, असे सुब्रमण्यम म्हणाले.
सुब्रमण्यम यांनी ट्विट केले आहे की, कालचा पूर्ण दिवस मी अहमदाबादमध्ये घालावला ज्याचे नाव अद्याप कर्णावती करण्यात आलेले नाही. २०१३ साली मोदी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यासंदर्भात केंद्राला सुचवले होते.
गेल्या काही वर्षांत शहरांचे नामांतर करून त्यांना त्यांची प्राचीन नावे देण्याची मागणी जोर धरत आहे. भाजपच्या राज्यात हे काम वेगाने होत आहे. अनेक शहरांची नावे बदलली गेली आहेत. इलाहाबादला प्रयागराज, फैजाबादला अयोध्या असे नाव देण्यात आले. यानुसार अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची मागणी केली जात आहे. भाजप नेता सुब्रमण्यम यांचे म्हणणे आहे की, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ही मागणी केली होती. आता ते पंतप्रधान असूनही नामांतर करण्यास तयार नाहीत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती व अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संघाने यापूर्वीही अशी मागणी केली आहे. तेलंगणची राजधानी हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याचीही मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असताना नामांतर का शक्य नाही, असा प्रश्न सुब्रमण्यम यांनी उपस्थित केला आहे. ते भाजपचेच नेते असूनही विरोधकांप्रमाणे पक्षाला प्रश्न विचारत असतात.