

माझेच पैसे वापरून माझी पत्नी आणि न्यायालयाकडून छळ केला जात असल्याचा आरोप करत बंगळुरूत एआय इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष मोदी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी जवळपास दीड तासाचा एक व्हीडिओ शूट करून आपल्यावर कसा आणि कुणी अन्याय केला हे सांगितलंय. याशिवाय २४ पानांची सुसाइड नोटही लिहिली. अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिचे कुटुंबिय आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं म्हटलंय.
सुसाइड नोटमध्ये अतुल यांनी म्हटलं की, निकीता आणि तिच्या कुटुंबियांनी माझ्यावर घरगुती हिंसाचार, हत्येचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळासह ९ गुन्हे दाखल केले होते. अतुल आणि निकीता यांचं लग्न २०१९ मध्ये झालं होतं. अतुल यांनी सांगितलं की लग्नानंतर लगेचच निकीता आणि तिच्या कुटुंबियांनी काही ना काही कारणाने पैसे मागण्यास सुरुवात केली होती.