हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनांशी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्याविरुध्द गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khurshid

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचं नवं पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' वादात सापडलंय.

हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनांशी करणाऱ्या माजी मंत्र्याविरुध्द गुन्हा

दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांचं नवं पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times') वादात सापडलंय. या पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस (ISIS) आणि बोको हरामसारख्या (Boko Haram) कट्टरवादी संघटनांशी केलीय. त्यावरून आता वाद सुरू झालाय. याप्रकरणी खुर्शीद यांच्यावर दिल्लीत गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात ‘द सॅफ्रॉन स्काय’ या अध्यायात ही टिप्पणी केलीय. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, की सध्याच्या युगातील हिंदुत्वाचं राजकीय स्वरूप संत-सनातन आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला सारताना दिसतंय. ते ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामी संघटनांसारखं आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: हिंदूत्वाची ISISसोबत तुलना; वादावर खुर्शीद म्हणतात, 'देशात स्वातंत्र्य आहे की नाही?'

दरम्यान, बुधवारी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आलीय. दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना 'हिंदू धर्माची दहशतवादाशी तुलना आणि बदनामी' केल्याबद्दल काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची विनंती केली होती. गर्ग म्हणाले, सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची बदनामी केलीय. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी केली असून त्यांच्यावर देशद्रोहासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. दरम्यान, खुर्शीद यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, यातून काँग्रेसची खरी मानसिकता दिसून येते. ते हिंदूंसोबत समानता निर्माण करून ISIS च्या कट्टरपंथी घटकांना कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करताहेत. याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकाच्या विमोचनप्रसंगी म्हटलं होतं की, 6 डिसेंबर 1992 रोजी जे काही झालं, ते चुकीचं होतं. आपल्या राज्यघटनेला बदनाम करणारी ही घटना होती. या घटनेमुळं दोन समाजात अतूट दरी निर्माण झालीय. मी 100 वेळा म्हणेन, ते खूप चुकीचंच होतं. दरम्यान, 300 लोकांवर आरोप झाले आणि त्यांची निर्दोष मुक्तताही झालीय. त्यामुळं जशी जेसिकाची हत्या कोणी केली नाही, तशी बाबरी मशीदही कोणी पाडली नाही, असंही ते म्हणाले.

loading image
go to top