कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्यास वरिष्ठ जबाबदार नाहीत : न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लादलेल्या कामाच्या तणावामुळे कर्मचारी अनेकदा प्रचंड तणावाखाली असतात. मात्र, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविता येणार नाही. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करता येणार नाही.

नवी दिल्ली : कामामध्ये असलेला अतिताण आणि त्यामुळे निर्माण होणारे नैराश्य या सर्वांमुळे अनेकदा कर्मचारी नाराज होऊन आपली जीवनयात्रा संपवत असतात. त्यानंतर आता यावर सर्वाच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कर्मचाऱ्यांनी अतिताणामुळे आत्महत्या केल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दोषी ठरविण्यात येणार नाही. तसेच त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाईही केली जाणार नाही.

शिक्षण उपसंचालक असलेले किशोर पराशर यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने किशोर पराशर यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अतिताण दिला जात होता. किशोर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या वेळेव्यतिरिक्त आणि सुट्ट्यांमध्येही त्यांना कामाला बोलविण्यात येत होते. तसेच त्यांचा पगारही थांबविण्यात आला होता. याशिवाय त्यांची पगारवाढही थांबविण्यात आली होती. या सर्व तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करत होती. त्यावर सर्वोच्च न्यायालायाने निकाल दिला. 

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लादलेल्या कामाच्या तणावामुळे कर्मचारी अनेकदा प्रचंड तणावाखाली असतात. मात्र, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविता येणार नाही. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करता येणार नाही. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाईही केली जाणार नाही. 

Web Title: Superior not guilty if staffer ends life due to heavy workload