राजधानीत फटाक्‍यांच्या विक्रीवर बंदी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने "एनसीआर'सह संपूर्ण दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्रीवर आज बंदी घातल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने "एनसीआर'सह संपूर्ण दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्रीवर आज बंदी घातल्याचे स्पष्ट केले.

त्याचबरोबर फटाक्‍यांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करा, असा आदेशही न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी) दिला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत फटाक्‍यांच्या विक्रीवर राजधानीत बंदी लागू राहील, असे न्यायलयाने सांगितले; परंतु फटाके वाजविण्यावर बंदी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. फटाके उडविण्यावरील बंदीची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे मत न्यायालयाने या वेळी व्यक्त केले.

राजधानी दिल्लीतील प्रदूषण धोकादायक पातळीच्याही पुढे गेले असल्याचा अनुभव काही दिवसांपूर्वीच दिल्लीकरांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर काही दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली होती. अनेक पर्यावरणवाद्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्‍यांवर बंदी घालण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. या प्रकरणी आज सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यिय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या वेळी "एनसीआर'सह संपूर्ण दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्रीवर त्वरित बंदी घालण्याचा आदेश खंडपीठाने दिला. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून (ता. 25) करण्यात येणार आहे, तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहील, असेही खंडपीठाने म्हटले आहे. फटाक्‍यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याची माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने याचिकाकर्ते अर्जुन गोपाल यांच्यासह "सीपीसीबी'ला दिला आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी यापूर्वीच फटाक्‍यांच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. धार्मिक उत्सवांना ही बंदी लागू नसेल, असे जंग यांच्या आदेशात नमूद करण्यात आले होते.

फटाके उडविण्यावर बंदी नाही
- "एनसीआर'सह संपूर्ण दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्रीवर बंदी
- मात्र, फटाके उडविण्यावर बंदी नाही
- फटाके विक्रीचा नवा परवाना दिला जाणार नाही
- फटाके विक्रीच्या विद्यमान परवान्यांना स्थगिती
- पुढील आदेश मिळेपर्यंत फटाक्‍यांच्या विक्रीवर बंदी राहणार
- फटाक्‍यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची माहिती देण्याची सूचना

Web Title: Supreme Court bans selling of crackers in New Delhi