चिदंबरम यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर पण... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मंजूर झाला असून, या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) दोघेही करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना 24 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर येता येणार नाही. 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला असून, आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मंजूर झाला असून, या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) दोघेही करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना 24 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर येता येणार नाही. 

न्यायाधीश आर. भानुमती यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, पी. चिदंबरम यांना तुरुंगातून बाहेर जाता येईल, पण त्यासाठी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घ्यावा लागणार आहे. त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. देश सोडून जाता येणार नाही. तपास यंत्रणा जेव्हा पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी बोलावतील तेव्हा त्यांना यावे लागेल. 

दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात चिदंबरम यांना जामीन देऊ नये, असे सांगितले. मात्र, न्यायालयाने अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court grants bail to Chidambaram in INX Media case filed by CBI