NEET -JEE नियोजित वेळेतच होणार; सर्वोच्च न्यायालयाने 6 राज्यांची याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

परीक्षांच्या आय़ोजनावर पुनर्विचार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सहा राज्यांनी दाखल केलेली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा कहर देशात वाढला आहे. गेल्या आठवड्याभरात भारतात दररोज 70 हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जेईई आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर परीक्षांच्या आय़ोजनावर पुनर्विचार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सहा राज्यांनी दाखल केलेली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

जेईई आणि नीट परीक्षा होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सहा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी या परीक्षांचे आयोजन पुढे ढकलण्यात य़ावं यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याआधी 17 ऑगस्टला दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. याचिकेमध्ये सध्या कोरोनाच्या संकटात परीक्षा घेताना समोर येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधलं होतं. मात्र आता परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचं न्यायालयाने म्हटलं. 

हे वाचा - कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज : लष्कर प्रमुख

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी जेईई आणि नीट परीक्षेबाबत दाखल कऱम्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. पश्चिम बंगालचे मंत्री मलय घटक, झारखंडचे मंत्री रामेश्वर ओरांव, राजस्थानचे मंत्री रघु शर्मा, छत्तीसगढचे मंत्री अमरजीत भगत, पंजाबचे मंत्री केबीएस सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

याआधी जेईईच्या मुख्य परीक्षेचं आयोजन 1 ते 6 सप्टेंबर तर नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे. या परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावत आता नियोजित वेळेतच परीक्षा होतील असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court refuses seeking review NEET-UG and JEE exam