शहाबुद्दीनला तिहारमध्ये आणा - सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यामध्ये शहाबुद्दीनला तिहारला आणण्याचे आदेश दिले. तसेच शहाबुद्दीनवर बिहारमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांवरील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - बिहारमधील सिवान तुरुंगात असलेला राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहंमद शहाबुद्दीन याला दिल्लीतील तिहार कारागृहात आणण्याचे आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. 
 
नुकताच तुरुंगातून सेल्फी व्हायरल झाल्याप्रकरणी शहाबुद्दीन आणि अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सध्या बिहारमधील सिवान तुरुंगात असलेला शहाबुद्दीनला तिहारला आणण्याचे आदेश दिल्याने त्याच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शहाबुद्दीनचे तीन फोटो तुरुंगातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले होते. सिवानमध्ये दोन भावांची ऍसिड टाकून हत्या केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शहाबुद्दीन सिवानच्या तुरुंगात होता. 

सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यामध्ये शहाबुद्दीनला तिहारला आणण्याचे आदेश दिले. तसेच शहाबुद्दीनवर बिहारमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांवरील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हत्या झालेले पत्रकार राजदेव रंजन यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला तिहारला आणण्यास सांगितले. रंजन यांच्या पत्नी आशा यांना डिसेंबरमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

Web Title: Supreme Court transfers Shahabuddin from Siwan jail to Tihar