
मोदी सरकारमधील सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना पसंती दर्शवली आहे.
नवी दिल्ली- पुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे. परंतु, एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजून कायम आहे. कोरोना आणि सीमेवर चीनबरोबर तणावाची स्थिती असतानाही या सर्व्हेमध्ये देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून मोदींचे नाव समोर आले आहे. 'इंडिया टुडे' आणि 'कार्वी इनसाइट्स'च्या मूड ऑफ द नेशन पोलमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. जर आज निवडणुका झाल्या तर एनडीए पुन्हा एकदा सत्ता काबीज करु शकते.
या सर्व्हेनुसार 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 दरम्यान देशातील सुमारे 12232 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये 67 टक्के ग्रामीण तसेच 33 टक्के शहरी लोकसंख्येचा समावेश होता. जर आज निवडणूक झाली तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला लोकसभेतील 543 जागांपैकी 321 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला केवळ 51 जागांवरच विजय मिळू शकतो. त्याचबरोबर इतरांच्या खात्यात 129 जागा येऊ शकतात.
हेही वाचा- काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे?; कार्यकारिणीची आज बैठक
या सर्व्हेदरम्यान देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रीबाबत जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर येतो. त्यांना 14 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या यादीत तिसरा नंबर लागतो. त्यांच्या बाजूने 8 टक्के लोकांनी मत दिले आहे.
मोदी कॅबिनेटमधील सर्वोत्कृष्ट मंत्री
या सर्व्हेमध्ये लोकांना मोदी कॅबिनेटमधील सर्वोत्कृष्ट मंत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 39 टक्के लोकांनी अमित शहा यांना सर्वात चांगले मंत्री ठरवले आहे. तर 14 टक्के राजनाथ सिंह यांचा नंबर येतो. तर नितीन गडकरी या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत. त्यांना 10 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही लोकांनी पसंती दिली आहे. 8 टक्के लोकांनी त्यांना या यादीत त्यांना चौथ्या नंबरवर ठेवले आहे.
हेही वाचा- काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी आणि कोण? काय घडलं CWCच्या बैठकीत
कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी 23 टक्के लोकांनी त्यांना योग्य ठरवले आहे. तर 50 टक्के लोकांच्या मते या दरम्यान पंतप्रधान मोदींनी चांगले काम केले आहे. तर 18 टक्के लोकांना या काळातील मोदींचे काम साधारण वाटले. त्याचबरोबर 7 टक्के लोकांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचे मत व्यक्त केले.