रिया चक्रवर्तीची काढली 'लायकी'; बिहारच्या पोलिस महासंचालकांचं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

सुप्रीम कोर्टाने आज सीबीआय चौकशीला अनुमती दिल्यानंतर, बिहार पोलिसांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. रिया चक्रवर्ती संदर्भातही  गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली

नवी दिल्ली/पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीची मुंबई पोलिसांकडे गुन्हा स्थांनातरित करण्याची मागणी फेटाळून लावत बिहार सरकारने केलेली सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली. दरम्यान, बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी न्यायालयाचा निकाल हा न्याय आणि लोकशाहीचा विजय असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 

रियाची लायकी नाही : पांडे
पांडे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तींवर टीका केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबईतच व्हावी, असं रिया चक्रवर्तीनं याचिकेत म्हटलं होतं. तसेच बिहारच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीर हा मुद्दा राजकीय होत असल्याची भीतीही तिनं व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाने आज सीबीआय चौकशीला अनुमती दिल्यानंतर, बिहार पोलिसांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. रिया चक्रवर्ती संदर्भातही  गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून 'तिची मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भाष्य करण्याची लायकी नाही,' असे पांडे म्हणाले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांमुळे आज यश मिळाल्याचे ते म्हणाले. पाटणा येथे रियाविरोधात दाखल झालेला गुन्हा योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितल्याचे पांडे म्हणाले.

ते म्हणाले, 'अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय आहे. असत्यावर सत्याचा विजय आहे. आज आपल्याला न्यायधीशाच्या रुपातून अप्रत्यक्षपणे ईश्वराचे दर्शन होत आहे. या तपासात महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केले नाही आणि ही बाब संपूर्ण देशाने पाहिली. अर्ध्या रात्री एका आयपीएस अधिकाऱ्याला एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक देत क्वारंटाइन केले गेले. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची देखील दखल घेतली.'

हे वाचा - बिहारचे DGP म्हणाले, आम्ही बरोबर होतो हे सिद्ध झाले

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह याची बहिण श्वेता सिंह किर्ती यांनी ट्विट करत देवाचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटले की, देवा तुझे आभार, आमची प्रार्थना ऐकली. खरं तर ही, आता सुरुवात आहे. सत्याकडे जाणारे पहिले पाऊल आहे. सीबीआयवर पूर्ण विश्वा्स आहे, असे श्वेता सिंह किर्ती यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांचे वकिल विकास सिंह यांनी न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली. सुशांत यांच्या कुटुंबीयाचा विजय आहे. या निर्णयाला आव्हान देता येईल, अशी कोणतीच संधी न्यायालयाने दिलेली नाही. यासंदर्भात कोणताही अन्य गुन्हा दाखल होत असेल तर त्याचीही सीबीआय चौकशी केली जाणार आहे. मृत्यूशी निगडीत सर्व प्रकरणांची आणि घटनांची सीबीआय चौकशी करणार आहे, असे के. के. सिंह यांच्या वकिलांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case cbi supreme court bihar dgp gupteshwar pande on Rhea Chakraborty