परिणामांचा विचार करा: संतप्त स्वराज यांचा इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जाधव यांना फाशी देणे ही पूर्वनियोजित हत्याच आहे. जाधव यांना फाशी दिली गेल्यास भारत-पाक द्विपक्षीय संबंधांवर या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाचा पाकने विचार करावा

नवी दिल्ली - भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय अंमलात आणल्यास त्याचे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांवर होणारे परिणाम पाकिस्तानने लक्षात घ्यावेत, असा गर्भित इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (मंगळवार) दिला. जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा निर्धारही स्वराज यांनी यावेळी व्यक्त केला.

"जाधव यांनी पाकिस्तानमध्ये कोणतेही गैरकृत्य केल्याचा एकही पुरावा नाही. अशा वेळी जाधव यांना फाशी देणे ही पूर्वनियोजित हत्याच आहे. जाधव यांना फाशी दिली गेल्यास भारत-पाक द्विपक्षीय संबंधांवर या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाचा पाकने विचार करावा,'' असे स्वराज म्हणाल्या. राज्यसभेस संबोधित करताना स्वराज यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. जाधव हे "भारताचे पुत्र' असल्याची भावना व्यक्त करत स्वराज यांनी त्यांच्या सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत कोणतेही न्यून राहणार नाही, अशी ग्वाही दिली.

याआधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यासंदर्भात लोकसभेत निवेदन दिले होते. पाकिस्तानने जाधव प्रकरणी कायदा व न्यायासंदर्भातील सर्व संकेत पायदळी तुडविले असल्याचे स्पष्ट करत सिंह यांनी पाकच्या दाव्याप्रमाणे जाधव हे भारतीय हेर असतील; तर त्यांच्याकडे भारतीय पारपत्र कसे असेल, अशी विचारणा केली होती. जाधव यांना फाशी देण्यासंदर्भातील या निर्णयाचे द्विपक्षीय संबंधांवर दूरगामी पडसाद उमटण्याची गंभीर शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारताकडून पाकला देण्यात आलेला इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि न्यायाच्या मुलभूत नियमांना डावलून पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. 

Web Title: Sushma Swaraj asks Pakistan to consider the consequence