सुषमा स्वराज मंत्रिमंडळात नाहीत.. अपेक्षित, तरीही धक्कादायक क्षण!

sushma-swaraj
sushma-swaraj

मोदी शपथविधी : नवी दिल्ली : सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजयासह केंद्रात विराजमान होत असलेल्या भाजपच्या शपथविधी सोहळ्याला आज (गुरुवार) एक भावनिक किनारही होती. गेली पाच वर्षे ठामपणे आणि समर्थरित्या परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांचा नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नाही, यावर आज सायंकाळी शिक्कामोर्तब झाले.

'लो प्रोफाईल' राहत, फारसा गाजावाजा न करत काम चोखरित्या पार पाडण्याबद्दल स्वराज यांची ख्याती आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला. परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठी स्वराज एक समर्थ आधार म्हणून प्रत्येक वेळी उभ्या राहिल्या. ट्विटरवर स्वत: सक्रिय असलेल्या स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणि संपर्कात आणले. त्यामुळेच सोशल मीडियावरील असंख्य युझर्सच्या त्या लाडक्या आहेत.

पण, गेल्या काही महिन्यांपासून स्वराज यांची तब्येत खराब आहे. यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. धुळीपासून आणि गर्दीपासून लांब राहण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. 

आता भाजप सरकार दणदणीत बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेत दाखल झाले आहे, पण अरुण जेटली आणि सुषमा स्वराज या दोन ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्र्यांना प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रिमंडळातून बाहेर राहावे लागले. या दोघांनीही तशी विनंती मोदी यांना केली होती.

मोदींच्या आजच्या शपथविधीच्या सोहळ्यास स्वराज आवर्जून उपस्थित होत्या. पण त्या प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या शेजारीच जेटलीही बसले होते आणि गेल्या मंत्रिमंडळातील सर्वांत प्रभावी मंत्र्यांपैकी दोघेजण त्रयस्थपणे आपल्या सहकार्‍यांच्या शपथविधीचे साक्षीदार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com