सुषमा स्वराज यांनी चीनसमोर टेकले गुडघे : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

"सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले. सरकारने अशा पद्धतीने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : देशाचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले आहेत. तसेच या अशा पद्धतीने सरकारने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) केली. 

भारत आणि चीनमधील डोकलाम प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा विषय बनत आहे. त्यावर आज राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वी डोकलाम वादावरुन सुषमा स्वराज यांनी बुधवारी सांगितले होते, की डोकलामचा वाद राजकीय परिपक्वतेने मिटवण्यात आला असून, देशाने एक इंचदेखील जमिन गमावलेली नाही. जशी परिस्थिती यापूर्वी होती तशीच आता परिस्थिती कायम आहे. 

त्यांच्या या विधानानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. "सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले. सरकारने अशा पद्धतीने चीनसमोर लोटांगण घातल्याने सीमेवर तैनात असलेल्या जवानांचाही विश्वासघात केला''.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या विधानानंतर अमेरिकेने डोकलामसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले होते. भारत आणि चीनने माघार घेतली असलीतरी चीन छुप्या पद्धतीने डोकलाममध्ये सक्रीय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले होते.

Web Title: Sushmaji prostrated herself in front of Chinese power says Rahul Gandhi