बलात्कारप्रकरणी राजद आमदार दोषी 

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते.

पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते.

नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह यादव यांनी या आरोपींना दोषी ठरविले आहे. यादव यांच्याबाजूने 22 आणि बचाव पक्षाच्या बाजूने 15 जणांनी साक्ष दिली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शिक्षेबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2016 मध्ये नालंदातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या सर्वांवर होता. अत्याचाराची घटना राधावल्लभ यांच्या नवादातील निवासस्थानी झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

पीडित मुलीने नऊ फेब्रुवारी 2016 रोजी बिहार शरीफमधील महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात राधावल्लभ यांचे नाव होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. गुंड राजकारणी अशी त्यांची प्रतिमा असून, त्यांना अटक झाल्यावर राजदने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. 21 डिसेंबरला शिक्षा सुनावल्यावर राधावल्लभ यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द होईल. न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यावर या संदर्भात कारवाई केली जाईल, असे विधानसभाध्यक्ष विजय कुमार चौधरी यांनी नमूद केले. 

Web Title: Suspended RJD MLA Rajballabh Yadav convicted in minor rape case