माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला देशाच्या राज्यघटनेबाबत आदर नाही हेच पाकूरमधील घटनेतून दिसून येते. माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. 
- स्वामी अग्निवेश, सामाजिक कार्यकर्ते 

रांची- झारखंडमध्ये माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हे नियोजित कारस्थान होते, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही पावले उचलली नाहीत, असे ही अग्निवेश म्हणाले. 

पाकूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. या घटनेची राज्य किंवा केंद्र सरकारकडून चौकशी केली जाईल, अशी मला आशा नाही, असेही स्वामी अग्निवेश यांनी स्पष्ट केले. 

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना सोडून देण्यात आले, यावरून राज्य सरकारचा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो, असेही स्वामी अग्निवेश या वेळी म्हणाले. पाकूर येथे मंगळवारी स्वामी अग्निवेश यांना "भाजयुमो' आणि "अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. तसेच, त्यांचे कपडे फाडत शिवीगाळ केली होती. 

"आदिवासींच्या हक्कांसाठी लढत राहणार' 
देशातील आदिवासींची परिस्थिती अत्यंत वाईट असून, आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यात मागील 50 वर्षांतील सर्वच सरकारे अपयशी ठरली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या हक्कांसाठी देशभर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. आमच्या आंदोलनामध्ये एक लाख आदिवासी नागरिकांनी हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यामुळे माझा आवाज दाबण्यासाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोपही स्वामी अग्निवेश यांनी केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला देशाच्या राज्यघटनेबाबत आदर नाही हेच पाकूरमधील घटनेतून दिसून येते. माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. 
- स्वामी अग्निवेश, सामाजिक कार्यकर्ते 

 

Web Title: Swami Agnivesh Alleges it Attack is prepalned