esakal | तमिळनाडूत द्रमुकची सत्ता; राहुल गांधींच्या सदिच्छा

बोलून बातमी शोधा

तमिळनाडूत द्रमुकची सत्ता; राहुल गांधींच्या सदिच्छा

तमिळनाडूत द्रमुकची सत्ता; राहुल गांधींच्या सदिच्छा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चेन्नई : तमिळनाडू विधानसभेमध्ये द्रमुकने विजयी झेंडा फडकावला आहे. याठिकाणी द्रमुक आघाडीला 149 हून अधिक जागांवर सरशी मिळाली आहे तर अण्णा द्रमुक आघाडीला 84 जागांवर सरशी मिळाली आहे. तमिळनाडूत आता एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार आहे, हे स्पष्ट झालं असून अण्णा द्रमुक सलग तिसऱ्यांदा पक्ष स्थापन करण्यात अयशस्वी ठरला आहे.

(निवडणुकीच्या लाइव्ह अपडेट्स रात्री 9 वाजेपर्यंतच्या असून यापुढील अपडेट आणि इतर घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा)

 • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर एम के स्टालिन यांना सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, या विजयाबद्दल तुमचे अभिनंदन. तमिळनाडूच्या जनतेनं परिवर्तनासाठी मते दिली आहेत आणि तुमच्या नेतृत्वाखाली बदल घडेल हे निश्चित! त्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक पावले टाकण्यासाठी खूप सदिच्छा!

 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटंलय की, तमिळनाडू विधानसभेत स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.

 • 140 हून अधिक जागांवर द्रमुक आघाडी पुढे

 • उदय स्टालिन यांनी पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे.

 • समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी द्रमुक पक्षाचे प्रमुख एम के स्टालिन यांना विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

 • विजयाचा आनंद साजरा करणं थांबवा, असं आवाहन द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन यांनी केलं आहे. द्रमुकने या तमिळनाडूमध्ये 119 जागांवर आघाडी घेतली आहे.

 • द्रमुकचे कार्यकर्ते आणि हितचिंतक पक्ष कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा करत होते. निवडणूक आयोगाच्या कारवाईच्या आदेशानंतर आता कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलं आहे.

 • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन द्रमुकच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीमधील निर्णायक विजयाबद्दल एम के स्टालिन यांचं या खूप खूप अभिनंदन! तमिळनाडूच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

 • निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, द्रमुकने 118 जागांची मॅजिक फिगर पार केली आहे. सध्या द्रमुक 119 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुकचा सहकारी पक्ष काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांच्या आघाडीने सध्या राज्यात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. सध्या अण्णा द्रमुक 82 जागांवर पुढे आहे.

 • कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेना झाला आहे. आमच्या नेत्यांनी त्यांना घरी राहूनच आनंद साजरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कारण निवडणूक आयोगाने सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आपण एक जबाबदार राजकीय पक्ष आहोत. - टीकेएस एलांगोव्हन, द्रमुक, चेन्नई

 • अभिनयातून राजकारणात उतरलेल्या खुशबू सुंदर या थाउझंड लाईट्स मतदारसंघात जवळपास 2 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघात द्रमुकच्या एक्झिलन यांनी आघाडी घेतली आहे.

 • निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या विजयोत्सवावर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य मुख्य सचिवांना दिले आहेत.

 • निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात विजयोत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. तरीही, द्रमुकचे समर्थक पक्ष कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

 • उदयनिधी स्टालिन हे आपल्या पहिल्याच निवडणुकीत चेपाक-थिरुवालीकेनी मतदारसंघातून 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सध्या त्यांना 69.53 टक्के मते मिळाली आहेत. पीएमके पक्षाचे एव्हीए कस्साली हे पिछाडीवर आहेत. नाम तामिलर काटची पक्षाचे जयसिमराजा हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

 • द्रमुकचे एझिलीयन एन हे थाउझंड लाईट मतदारसंघातून आघाडीवरआहेत तर भाजपच्या खुशबू सुंदर पिछाडीवर आहेत.

 • द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन हे कोलाथूर मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत.

 • द्रमुकचे उदयनिधी स्टालिन हे सध्या चेपुक-थिरुवल्लीकेनी या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. ते द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन यांचे सुपुत्र आहेत.

 • विद्यमान मुख्यमंत्री एडापड्डी के पलानिस्वामी सध्या त्यांच्या मतदारसंघ एडापड्डीमधून आघाडीवर आहेत. चारवेळा आमदार राहिलेले पलानिस्वामी सध्या सहाव्या फेरीनंतर 25 हजार मतांनी पुढे आहेत.

 • अण्णा द्रमुक पश्चिम तमिळनाडूमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. या ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत.

 • तमिळनाडूमध्ये भाजप सध्या पाच जागांवर पुढे आहे. यामध्ये तिरुनेलवेली, धऱमपुरम, हारबर, निलगिरी आणि कन्याकुमारी या मतदारसंघांचा समावेश आहे. ही सरशी पक्षासाठी आनंददायी आहे. कारण मागच्या निवडणुकीत पक्षाला शून्य जागा जिंकता आल्या होत्या.

हेही वाचा: Live: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा 'ममताराज'

 • द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी चेन्नईमधील पक्ष कार्यालयासमोर विजयाचा आनंद साजरा करायला सुरवात केली आहे.

 • द्रमुक पक्षाची आघाडी सध्या 139 जागांवर पुढे आहे तर अण्णा द्रमुक आणि त्यांचे सहकारी पक्ष सध्या 93 जागांवर पुढे आहेत. एकटा द्रमुक हा पक्ष 111 जागांची सरशी घेऊन आहे. मात्र, एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करण्यापासून तो काकणभर दूर आहे. सध्या 118 जागांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी द्रमुक आपल्या सहकारी मित्र पक्षांवर अवलंबून आहे. तर दुसरीकडे अण्णा द्रमुक पक्ष उत्तर आणि पश्चित तमिळनाडूमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. असं असलं तरीही या पक्षाचे अनेक मंत्री सध्या आपल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

 • तमिळनाडूमध्ये भाजपाचे अध्यक्ष एल. मुरुगन धरमपुरम मतदारसंघातून 800 मतांनी आघाडीवर आहेत. त्याठिकाणी द्रमुकच्या कायालविझी एन. यांच्याशी त्यांची टक्कर आहे.

 • मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हसन सध्या दक्षिण कोयंबतूर मतदारसंघात आघाडीवर आहेत.

 • द्रमुकचे एम के स्टालिन यांचा मुलगा उधयनिधी स्टालिन चेपुक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. ही त्याची पहिलीच निवडणूक आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही भाजपविरोधी तत्त्वांचे आहोत. हे खरंय की ते काहीही करु शकतात मात्र, आम्ही त्यांना नीटपणे हाताळू. द्रमुकच्या आमदारांना कुणीही खरेदी करु शकत नाही.

हेही वाचा: Live : केरळचा कौल LDFला

 • मतमोजणीच्या एका तासानंतर, सुरवातीच्या कलांनुसार, द्रमुकला 37 जागांवर तर अण्णा द्रमुकला 32 जागांवर आघाडी आहे. एमएमके हा पक्ष देखील एका जागेवर आघाडीवर असून कमल हसन यांचा एमएनएम पक्ष कुठेच आघाडीवर नाहीये.

 • सुरवातीच्या मतमोजणीमध्ये डीएमके 18 जागांवर पुढे आहे. तर अण्णा द्रमुक 12 जागांवर आघाडीवर आहे.

 • तमिळनाडू राज्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली आहे. चेन्नईमधील मतमोजणी केंद्राबाहेरील काही दृष्ये...