esakal | तामिळनाडू : बंद झालेला वेदांताचा स्टरलाइट प्लान्ट ऑक्सिजन निर्मितीसाठी पुन्हा होणार सुरु

बोलून बातमी शोधा

Vedanta Sterlite Plant

तामिळनाडू : बंद झालेला वेदांताचा स्टरलाइट प्लान्ट ऑक्सिजन निर्मितीसाठी पुन्हा होणार सुरु

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : देशात कोरोनाच्या भीषण परिस्थितीत ऑक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर प्रदुषणाच्या कारणामुळे सन २०१८ पासून बंद असलेला तुतिकोरिन येथील वेदांता कंपनीचा स्टरलाईट प्लान्ट पुन्हा सुरु करण्यास तामिळनाडू सरकारने सोमवारी परवानगी दिली. पण केवळ चार महिन्यांसाठीच ही परवानगी देण्यात आली असून या प्लान्टमधून केवळ ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वेदांताचा प्लान्ट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पलानीस्वामी यांनी तुतिकोरिन येथील वेदांताच्या स्टरलाइट प्लान्टला ऑक्सिजन निर्मितीसाठी परवानगी दिली. ही तात्पुरती परवानगी असून केवळ चार महिन्यांसाठीच हा प्लान्ट सुरु राहणार आहे. या प्लान्टमधून केवळ ऑक्सिजनचं उत्पादन केलं जाणार आहे, तांबे धातू आणि इतर उत्पादनं सुरु होणार नाहीत.

हेही वाचा: आता दिल्लीकरांना लस मिळणार मोफत, केजरीवालांची घोषणा

देशातील इतर राज्यांप्रमाणे तामिळनाडूमध्ये देखील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून या राज्याला दरदिवशी ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. सध्याच्या मागणीचा कल पाहता पुढील काळात ही मागणी ४५० मेट्रिक टनपर्यंत पोहोचू शकते. तामिळनाडूत सध्या ऑक्सिजन उत्पादित करणारे २० प्रकल्प आहेत. मात्र, यांपैकी केवळ चारच प्रकल्प सुरु आहेत. यांपैकी आयनॉक्स, प्राक्झैर, सिसगिलसोल आणि टीएन ऑक्सिजन हे महत्वाचे चार प्रकल्प सुरु आहेत.

हेही वाचा: ‘केंद्र सरकार खरे आकडे लपवतेय’; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती की, केंद्रानं तामिळनाडूच्या वाट्याचा ८० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा साठा आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाकडे वळवला आहे. यामुळे तामिळनाडून ऑक्सिजनची मोठी समस्या निर्माण होईल असंही त्यांनी म्हटलं होतं.