पलानीस्वामी, पनीरसेल्वम एकत्र येण्याची शक्‍यता

पीटीआय
गुरुवार, 20 एप्रिल 2017

भविष्यामध्ये पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या गटाने हातमिळवणी केली तरीसुद्धा मुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाच्या खाते वाटपाचा तिढा वाढू शकतो

चेन्नई - चिन्नम्मा शशिकला यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनाकरन यांची "अण्णा द्रमुक'मधून हकालपट्टी केल्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

पनीरसेल्वम यांचा गट अण्णा द्रमुकमध्ये विलीन झाला तर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.
खुद्द पनीरसेल्वम यांनीही शशिकला आणि दिनाकरन यांना पक्षातून हाकलले तरच आपण विलीनीकरणाबाबत विचार करू, असे म्हटले आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या गटाने एकत्रिकरणाची चर्चा सुरू केली आहे. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्त्वाखालील "पुराथाची थलायवी अम्मा' हा गट स्वत:ला मूळ अण्णा द्रमुक समजतो. हाच गट शशिकला आणि दिनाकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली जावी यासाठी आग्रही आहे. भविष्यामध्ये पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या गटाने हातमिळवणी केली तरीसुद्धा मुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाच्या खाते वाटपाचा तिढा वाढू शकतो.

दिनाकरन यांच्या अडचणी वाढल्या
दिनाकरन यांच्याविरोधात दोन मनी लॉंडरिंग केसेसची नोंद असून, मागील आठवड्यामध्ये त्यांच्याविरोधात दिल्लीतील गुन्हे विभागाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याप्रकरणी "एफआयआर' नोंदविला आहे. यामुळे दिनाकरन यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचे बोलले जाते. शशिकला आणि त्यांचे कुटुंबीय हे पक्षावरील ओझे असल्याचे पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. त्यामुळेच दिनाकरन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

पक्षातील दोन गटांना एकत्र येण्यास आमचा कसलाच आक्षेप नाही. केवळ भीतीपोटी माझ्याविरोधात हे बंड करण्यात आले आहे. अनेक जण माझ्याविरोधात नाराज होते; पण त्यांच्या नाराजीचे कारण मला ठावूक नाही.
- टी.टी.व्ही. दिनाकरन, शशिकला यांचे भाचे

Web Title: Tamilnadu gripped in power politics