'एकत्वम' जाहीरातीनंतर तनिष्कची 'दिवाळी' जाहीरात पुन्हा ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

मात्र, अनेक लोक या जाहीरातीला समर्थन देखील करत आहेत.

नवी दिल्ली : तनिष्कची याआधीची एक जाहीरात चर्चेत आली होती. त्यात दाखवलेल्या आंतरधर्मीय विवाहाच्या कथेवरुन तिला वादग्रस्त ठरवण्यात आलं होतं. लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे कंपनीला ही जाहीरात मागे घ्यावी लागली होती. आणि आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने बनवलेली आणखी एक जाहीरात पुन्हा चर्चेत आली आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून या जाहीरातीवर टीका केली जात आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा
कंपनीने स्वत:चे 'एकत्वम' नावाचे ज्वेलरी कलेक्शन लाँच केले आहे. दिवाळीसाठी बनवलेल्या जाहीरातीमध्ये फटाकेबंदीचं त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तनिष्कवर काही लोकांकडून टीका केली जात आहे. ही जाहीरात नीना गुप्ता, सयानी गुप्ता, निमरत कौर, अलाया एफ यांच्यावर चित्रित केली गेली आहे. आणि या जाहीरातीत तनिष्कच्या ज्वेलरीने सजलेल्या महिला दिवाळीची चर्चा करत आहेत. यामध्ये त्यांनी फटाके उडवणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यावर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोलिंग करण्यात आले आहे. या ट्रोलिंगनंतर तनिष्ककडून हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. मात्र, ही जाहीरात युट्यूबवर उपलब्ध आहे. 

तनिष्कच्या जाहीरातीत जमलेल्या महिला दिवाळीच्या नियोजनाविषयी बोलत आहेत. यात त्या फराळ, आनंद, नातेसंबंध या सगळ्या विषयांबाबत बोलतात. तसेच त्यात त्या फटाके उडवणार नसल्याचं म्हणतात. मात्र, यातून ट्रोलर्सनी हिंदू सणांनाच फटाके बंदी का, असा सूर उठवत या जाहीरातीला ट्रोल केलं आहे. मात्र, अनेक लोक या जाहीरातीला समर्थन देखील करत आहेत. तनिष्कच्या या जाहीरातीत काहीही गैर नसून पर्यावरणाविषयी सजगतेने चिंता व्यक्त करण्याचा मुद्दा त्यांनी मांडलाय असं बऱ्याचजणांनी म्हटलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanishq diwali advertise trolled after purported love jihad advertise