Corona टेस्टचा 45 मिनिटांत रिपोर्ट; TATA ने तयार केले स्वदेशी किट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक लिमिटेडने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केलं आहे. परदेशात तयार झालेल्या किटवर होणारा खर्च वाचणार आहे आणि कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना टेस्ट किट खर्चिक असून त्याचे रिझल्ट येण्यास उशीर होत असल्यानं उपचारही वेळेवर होत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक लिमिटेडने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केलं आहे. परदेशात तयार झालेल्या किटवर होणारा खर्च वाचणार आहे आणि कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढणार आहे.

टाटाने लाँच केलेलं टेस्ट किट चीनीच्या टेस्ट किटपेक्षा जास्त प्रभावी आणि सहज वापरता येतं असा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाने तयार केलेल्या टेस्ट किटचं नाव TataMD CHECK असं ठेवलं आहे. Council Of Scientific And Industrial Research Institute Of Genomics and Integrative Biology यांनी एकत्र येऊन या टेस्ट किटची निर्मिती केली आहे.

कोविड 19 टेस्ट किट डिसेंबर महिन्यात देशातील सर्व लॅबमध्ये उपलब्ध होऊ शकते. सीईओ गिरिश कृष्णमूर्ती यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आयसीएमआर आणि डीसीजीआयकडून या टेस्ट किटला मंजुरी देण्यात आली आहे. चेन्नईत असलेल्या टाटा फॅक्टरीमध्ये दर महिन्याला अशा 10 लाख टेस्ट किटची निर्मिती करण्यात येणार आहे.

हे वाचा - Positive story: तुरुंगात शिक्षा भोगताना केला विश्वविक्रम; 8 वर्षात 31 पदव्या आणि सरकारी नोकरी

टाटाने तयार केलेल्या या टेस्ट किटमधून कमी वेळेत रिपोर्ट मिळणार आहे. इमेज बेस्ड रिझल्ट तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या या टेस्ट किटच्या वापरामुळे 45 ते 50 मिनिटातं रिझल्ट मिळणार आहे. किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटलटी यंत्रणा लागणार आहे. याशिवाय आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा रिपोर्ट हाती यायला 75 मिनिटे लागतील. हे टेस्ट किट पूर्णपणे भारतात तयार केलं आहे. 

किटचा वापर करण्यासाठी स्कील स्टाफची आवश्यकता नाही. याचा फायदा ग्रामीण आणि दुर्गम भागात होणार असून याठिकाणी आरोग्य सेवकसुद्धा कोरोना चाचणी करू शकतील. याची किंमत सांगण्यास सीईओंनी नकार दिला आहे. वेगवेगळ्या राज्य सरकारने खासगी लॅबसाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच याबाबतचा निर्णय घेतील असंही सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tata launch made in india corona test kit result come in 45 minute