तेलगू देसमला गोव्यात स्वारस्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोव्यातही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले असून गोव्यातील काही मातब्बर नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे. 

मडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोव्यातही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले असून गोव्यातील काही मातब्बर नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे. 

माजी मुख्यमंत्री व माजी खासदार असलेल्या दक्षिण गोव्यातील राजकीय नेत्याकडे दोनच दिवसांपूर्वी नायडू यांनी मोबाईलवर संपर्क साधून भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. तथापि, एका पक्षाकडे संबंधीत असल्याने आपण हा प्रस्ताव स्वीकारू शकत नसल्याचे या राजकीय नेत्याने नायडू यांना कळवले. 

नायडू यांनी दक्षिण व उत्तर गोव्यातील नेत्यांशी संपर्क साधून तेलगू देसम पक्षाच्या संभाव्य उमेदवारासाठी चाचपणी केली. भाजपला गोव्यात संधी देऊ नका असा सल्ला त्यांनी गोव्यातील नेत्यांना दिला, अशी माहिती एका राजकीय नेत्याच्या जवळच्या कार्यकर्त्याने दिली. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून आपल्यास व आपल्या जवळच्या व्यक्तिस उमेदवारी मिळावी यासाठी अनेक राजकीय नेते दिल्लीत धडकत आहेत. 

नायडू हे मंगळवारी नवी दिल्लीत पोचले असून नवी दिल्लीत ते भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दल (एस)चे अध्यक्ष देवेगौडा, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची ते भेट घेतील अशी अपेक्षा आहे.    

विशेष म्हणजे बाणावलीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हेही सध्या दिल्लीत आहेत. तथापि, आपली दिल्ली भेट फुटबाॅल संदर्भात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. `माझी भेट राजकीय स्वरुपाची नाही. फुटबाॅल संदर्भात काही काम असल्याने मी दिल्लीत आलो आहे` असे आलेमाव यांनी सांगितले. आलेमाव हे गोवा फुटबाॅल संघटनेचे (जीएफए) अध्यक्षही आहेत.

Web Title: TDP interested in Goa For Loksabha Election