तहसीलपुढे मृतदेह ठेवून शिक्षकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

वैद्यकीय प्रमाणपत्र देऊनही रजा मंजूर न करता निवडणुकीच्या कामावर सक्तीने पाठविलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी गुरुवारी (ता. 23) एटापल्ली येथील तहसील कार्यालयासमोर शिक्षकाचा मृतदेह ठेवून चार तास आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - वैद्यकीय प्रमाणपत्र देऊनही रजा मंजूर न करता निवडणुकीच्या कामावर सक्तीने पाठविलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त शिक्षकांनी गुरुवारी (ता. 23) एटापल्ली येथील तहसील कार्यालयासमोर शिक्षकाचा मृतदेह ठेवून चार तास आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. एटापल्ली तालुक्‍यातील भगवंतराव आश्रम शाळा, भापडा येथील शिक्षक नामदेव ओकटु ओंडरे यांचा रक्तदाब वाढल्याने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ओंडरे यांनी प्रकृती चांगली नसल्याने निवडणुकीच्या कामावर पाठवू नये, अशा विनंतीचा अर्ज केला होता. सोबतच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडले होते. मात्र, त्यानंतरही ओंडरे यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी गेदा ते एटापल्ली असा सोळा किलोमीटरचा प्रवास ओंडरे यांना चालत करावा लागला. यातच प्रकृती खालावल्याने त्यांना एटापल्लीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस उपनिरीक्षक विश्राम मदने यांनी मारहाण केल्याचा आरोप मृत ओंडरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ओंडरे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकावर बुर्गी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.

Web Title: Teachers agaiatin with deathbody