esakal | ‘टीम मोदी’चा महाविस्तार! पाहा संपूर्ण यादी
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

‘टीम मोदी’चा महाविस्तार! पाहा संपूर्ण यादी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा (Narendra Modi Mantrimandal) आज संध्याकाळी पहिलावहिला विस्तार (Expansion) झाला. यात ४३ मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ (Auth) घेतली. यात १५ कॅबिनेट व २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड (औरंगाबाद) व डॉ. भारती पवार (दिंडोरी, नाशिक) या चार चेहऱ्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा विस्तार करण्यात आला आहे. त्याचबरोबर १३ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. (Team Modi Mahaexpansion All List See)

मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले कपिल पाटील वगळता अन्य तिघे प्रथमच संसदेत आले आहेत हे विशेष. डॉ. कराड तर अक्षरशः काही महिन्यांपूर्वीच राज्यसभेत निवडून आले आहेत. नव्या संघाची निवड करताना मोदी यांनी युवा व उच्चशिक्षित चेहऱ्यांना सर्वाधिक संधी दिली आहे. गेल्या आठ वर्षांत प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात ११ महिला मंत्री झाल्या आहेत.

हेही वाचा: मोदींच्या मेगा कॅबिनेटमध्ये नारीशक्तीचा गौरव!

पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करताना ‘केमोथेरपी’च केली असून रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार व डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या बड्या चेहऱ्यांचा राजीनामा घेतला. नव्या टीम मोदींचा चेहरामोहरा युवा असून मंत्र्यांचे सरासरी वय ५८ आहे. दुसरीकडे राजीनामा देणाऱ्या ११ पैकी ९ मंत्र्यांनी साठी ओलांडली आहे. यात गहलोत (७३ वर्षे), गंगवार (७२), जावडेकर (७०), कटारिया (६९) गौडा (६८) प्रसाद (६६), डॉ. हर्षवर्धन (६६), प्रतापचंद्र सरंगी ( ६६ ), संजय धोत्रे ( ६२) व निशंक ( ६१) या ज्येष्ठ नागरिकांच्या गटातील मंत्र्यांना नारळ देण्यात आला. कोरोना काळातील प्रचंड गैरव्यवस्थापनात सरकारची बाजू नीट मांडली न जाणे, मंत्रालयांचा कारभार सांभाळता न येणे आणि वर्तनातील प्रचंड अहंकारीपणा ही मुख्य कारणे या मंत्र्यांच्या गच्छंतीमागे सांगितली जातात. राजनाथसिंह व मुख्तार नक्वी वगळता सर्व मंत्री अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात नसलेले म्हणजेच संपूर्ण नवीन आहेत.

राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी ६ वाजता झालेल्या या दिमाखदार शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते. राणे यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १५ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला. हरदीपसिंग पुरी, अनुराग ठाकूर, रिजिजू, जी. किशन रेड्डी व आर. के. सिंह यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. भाजप संघटनेत विशेष स्थान मिळविलेले राज्यसभेचे भूपेंद्र यादव यांनाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

नवे मंत्रिमंडळ उच्चशिक्षित असून ३ वकील, ६ डॉक्टर व ५ अभियंते यांच्यासह ७ माजी नोकरशहा आहेत. म्हणजेच शपथ घेतलेल्या ४३ पैकी तब्बल ३१ मंत्री उच्चशिक्षित आहेत. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्या राज्यातून सर्वाधिक ७ तर, त्या खालोखाल महाराष्ट्र व गुतरातमधून प्रत्येकी ४ मंत्री करण्यात आले आहेत. मात्र ही राज्ये वगळता पश्चिम बंगालपासून ईशान्य भारतापर्यंत व दिल्लीपासून तमिळनाडूपर्यंत साऱ्या राज्यांना प्रतिनिधित्व देत समतोल साधण्याचा प्रयत्नही दिसत आहे.

हेही वाचा: मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्य मंत्री; जाणून घ्या इतर खाती कोणाकडे?

या राज्यांना एकापेक्षा जास्त मंत्रिपदे - उत्तर प्रदेश -८, गुजरात - ५, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र - प्रत्येकी ४, बिहार - ३, मध्य प्रदेश २

टीम मोदीमधील जातीय समीकरणे

 • २७ - ओबीसी

 • ५ - अल्पसंख्याक

 • १२ - अनुसूचित जाती

 • ८ - अनुसूचित जमाती

 • ११ - महिला

नव्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये

 • मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सरासरी आयुष्य ५८ वर्षे

 • महिलांचा सहभाग वाढवत सात महिलांचा समावेश

 • चार सहकारी पक्षातील नेत्‍यांना संधी

 • १३ वकील, आठ डॉक्टर, पाच अभियंते आणि नागरी सेवेतील सात माजी अधिकारी

 • ओबीसी गटातील विक्रमी २७ मंत्री आणि पाच अल्पसंख्याक मंत्री

 • अनुसूचित जातीतील १२ व अनुसूचित जमातीमधील आठ मंत्री

 • चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

 • २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील नेत्यांचा समावेश

नवे मंत्री

कॅबिनेट

१) नारायण राणे

२) सर्बानंद सोनोवाल

३) डॉ. वीरेंद्र कुमार

४) ज्योतिरादित्य शिंदे

५) रामचंद्र प्रसाद सिंह

६) अश्विनी वैष्णव

७) पशुपती कुमार पारस

८) किरण रिजिजू

९) राजकुमार सिंह

१०) हरदीपसिंग पुरी

११) मनसुख मंडाविया

१२) भूपेंद्र यादव

१३) पुरुषोत्तम रुपाला

१४) जी. किशन रेड्डी

१५) अनुरागसिंह ठाकूर

राज्यमंत्री

१) पंकज चौधरी

२) अनुप्रिया सिंह पटेल

३) सत्यपालसिंह बघेल

४) राजीव चंद्रशेखर

५) शोभा करंदलजे

६) भानू प्रतापसिंह वर्मा

७) दर्शना विक्रम जार्दोस

८) मीनाक्षी लेखी

९) अन्नपूर्णा देवी

१०) ए. नारायण स्वामी

११) कौशल किशोर

१२) अजय भट्ट

१३) बनवारीलाल वर्मा

१४) अजयकुमार मिश्रा

१५) देवूसिंह चौहान

१६) भगवंत खुबा

१७) कपिल पाटील

१८) प्रतिमा भौमिक

१९) डॉ. सुभाष सरकार

२०) डॉ. भागवत कराड

२१) डॉ. राजकुमार रंजन सिंह

२२) डॉ. भारती पवार

२३) बिश्वेश्वर टुडू

२४) शंतनू ठाकूर

२५) डॉ. मुंजापारा महेंद्रभाई

२६) जॉन बार्ला

२७) डॉ. एल. मुरुगन

२८) डॉ. निशीथ प्रामाणिक

loading image