विमानात तांत्रिक बिघाड :165 प्रवाशांना उतरविले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

G 8 - 165 हे विमान धावपट्टीवरूनच परत गेले. प्रवाशांना दुसऱ्या विमानात पाठविण्यात आले. 

कोलकता : येथे सलग दोनवेळा उड्डाण करण्यात अपयशी ठरल्याने विमानातील सर्व प्रवाशांना अखेर उतरविण्याची वेळ आली. कोलकत्याच्या विमानतळावर आज (शुक्रवारी) सकाळी हा प्रकार घडल्याने 'गो-एअर'च्या प्रवाशांची फजिती झाली. 

गो-एअर या नागरी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीचे विमान कोलकता येथून दिल्लीकडे जाण्यासाठी उड्डाण घेत होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सलग दोनवेळा त्याचे उड्डाण अयशस्वी ठरले. यावेळी विमानात एकूण 165 प्रवासी होते. बिघाड झाल्यामुळे सर्व प्रवाशांना ऐनवेळी विमानातून उतरविण्यात आले. 

वैमानिकाने तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जी8-165 हे विमान धावपट्टीवरूनच परत गेले. प्रवाशांना दुसऱ्या विमानात पाठविण्यात आले. 
 

Web Title: Technical glitch : Go Air flight grounded at Kolkata