जामिनावर बाहेर असलेल्याला मंत्रीपद? तेजस्वींनी केला नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

आरोपी असलेल्या मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्री बनवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना बक्षिस अथावा लुटण्याची खुली सूट देऊ केली आहे का? असा सवाल तेजस्वींनी केला आहे. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 125 जागांसह बहुमत प्राप्त केले. जेडीयूच्या नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रीमंडळावरुन आता विरोधी आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयूकडून डॉ. मेवालाल चौधरी यांना मंत्री बनवलं आहे. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना केला फोन; विविध मुद्द्यांवर चर्चा

मेवालाल यांच्यावर असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. तरीही, नितीश कुमार यांनी फक्त मेवालाल यांनी मंत्रीच बनवलं नाहीये तर त्यांना शिक्षण मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारीही दिली आहे. राष्ट्रीय जनता दलाने यावरुन नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. बुधवारी तेजस्वी यादव यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. ज्यात त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पुरस्कार दिला गेला असल्याचं म्हटलंय. 

तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असिस्टंट प्रोफेसरच्या नियुक्तीत तसेच भवन निर्माणच्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणातील IPC 409,420,467, 468,471 आणि 120B च्या अंतर्गत आरोपी असलेल्या मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्री बनवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना बक्षिस अथावा लुटण्याची खुली सूट देऊ केली आहे का? असा सवाल केला आहे. 
हेही वाचा - संयुक्त राष्ट्रात सुधारणेची गरज; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

तारापूर मतदारसंघातून आमदार झालेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांना पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये सामिल केलं गेलं आहे. राजकारणात यायच्या आधी 2015 पर्यंत ते भागलपूर कृषी विद्यापीठाचे कुलपती होते. निवृत्तीनंतर त्यांनी जेडीयूच्या तिकीटावर तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. जिंकल्यानंतर त्यांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. कृषी विद्यापीठाच्या नियुक्तीसंदर्भातील घोटाळ्यात त्यांच्यावर 2017 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्यांना कोर्टातून अंतरिम जामिन प्राप्त झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejashwi makes serious allegations against jdu mla mewalaal chaudhary minister on interim bail