esakal | पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना केला फोन; विविध मुद्द्यांवर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

modi biden

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंघ अधिक दृढ होण्यासाठी कमला हॅरिस यांचे नेतृत्व निश्चितच उपयोगी पडेल. 

पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना केला फोन; विविध मुद्द्यांवर चर्चा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अभिनंदनाचा फोन केला आहे. याबाबतची माहिती मोदींनी स्वत: आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. या ट्विटमध्ये पुढे त्यांनी म्हटलंय की, दोन्ही देशांच्या म्हणजेच भारत आणि अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या दृढ निश्चयाबाबत आम्ही बोललो तसेच उभय देशांतील प्राधान्यक्रमांबाबत चर्चा झाली असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. 

हेही वाचा - पोप फ्रान्सिस यांनी बिकिनी मॉडेलचा फोटो लाइक केल्यानं खळबळ; मॉडेलनं दिली प्रतिक्रिया

मोदींनी ट्विट केलंय की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना फोन केला. आम्ही दोघांनीही भारत आणि अमेरिका या उभय देशांतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच कोविड-19 काळातील प्राधान्यक्रमांबाबत, पर्यावरणातील बदल आणि इंडो-पॅसिफीक भागामधील समन्वयाबाबतीतही चर्चा झाली. 

यानंतरच्या दुसऱ्याच ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनाही माझ्या शुभेच्छा मी पोहोचवल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, त्यांचं हे यश अत्यंत गर्वाचा विषय आहे. तसेच भारतीय-अमेरिकन समुदायासाठी ते प्रोत्साहन देणारे आहे. 

बायडन यांचा निवडणुकीत विजय जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केलं होतं आणि सांगितलं होतं की नव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर पुन्हा एकदा दोन देशांमधील संबंध अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत असताना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी बायडेन यांचे योगदान “महत्वपूर्ण आणि अमूल्य” राहिले असल्याचे त्यांनी म्हटले होतं.

हेही वाचा - ट्रम्प यांनी समन्वय साधला नाही तर अनेक अमेरिकन मृत्यूमुखी पडतील - बायडेन

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंघ अधिक दृढ होण्यासाठी कमला हॅरिस यांचे नेतृत्व निश्चितच उपयोगी पडेल.