
'..तेव्हा काय देव आणि खुदा नव्हते का?'; तेजस्वी यादव यांचा सवाल
देशात सध्या धार्मिक स्थळावर लाणण्यात येणाऱ्या भोंग्यावरून राजकारण तापलेलं आहे. उत्तर प्रदेशात याविरोधात सरकारने मोहिम सुरू केली आहे, आणि धार्मिक स्थळांवरून भोंगे काढले जात आहेत. या दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सवाल केला आहे की, जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा देव आणि खुदा नव्हते का? असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, लाऊडस्पीकरचा मुद्दा काढणाऱ्यांना मी विचारतो की, लाऊडस्पीकरचा शोध 1925 साली लागला आणि भारतातील मंदिरे/मशिदींमध्ये त्याचा वापर 70 च्या सुमारास सुरू झाला. जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा देव आणि खुदा नव्हते का?लाऊडस्पीकरशिवाय प्रार्थना, जागरण, भजन, भक्ती आणि साधना केली जात नव्हती का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दुसर्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, कोणताही धर्म किंवा देवासाठी लाऊडस्पीकर गरजेचे नाही. त्यांनी लिहिले आहे की, 'वास्तविक ज्यांना धर्म आणि कृतीचे मर्म कळत नाही, ते अनावश्यक विषयांना धार्मिक रंग देतात. एक आत्म-जागरूक व्यक्ती या मुद्द्यांना कधीही महत्व देणार नाही. देव नेहमी आपल्यासोबत असतो. तो प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कणात व्यापतो. कुठल्याच लाऊडस्पीकरमध्ये कुठलाही धर्म किंवा देवाला लागत नाही, असे देखील ते म्हणाले आहेत.
त्याचबरोबर एका ट्विटमध्ये सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, लाऊडस्पीकर आणि बुलडोझरवर चर्चा होत आहे, मात्र महागाई, बेरोजगारी यावर चर्चा होत नाही. त्यांनी लिहिलं आहे की, 'लाऊडस्पीकर आणि बुलडोझरवर चर्चा होत आहे. पण महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मजुरांवर बोललं जात नाही. जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, ज्यांना शिक्षण, औषध, नोकरी, रोजगार मिळत नाही. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, यावर चर्चा का होत नाही?'