राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना

वृत्तसंस्था
Friday, 9 October 2020

पुजारी बाबूलाल वैष्णव हे त्यांना मिळालेल्या जमिनीवर घर बांधणार होते. मात्र, मीना समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध दर्शवत त्या जमिनीवर आपला हक्क सांगितला.

जयपूर : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात जमीन वादातून एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. काहीजणांनी पेट्रोल टाकून पुजाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर भाजलेल्या पुजार्‍याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांनी अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पुजाऱ्याने पोलिसांनी मरण्याआधी सांगितले होते. हा वाद मंदिराच्या जमिनीबद्दलचा असून मंदिर ट्रस्टने काही जमीन उत्पन्नाचे साधन म्हणून पुजाऱ्याच्या नावावर केली होती. 

भारताची मिसाईल ताकद वाढली; एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम'ची यशस्वी चाचणी​

पुजारी बाबूलाल वैष्णव हे त्यांना मिळालेल्या जमिनीवर घर बांधणार होते. मात्र, मीना समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध दर्शवत त्या जमिनीवर आपला हक्क सांगितला. त्यावरून वाद झाल्यावर हे प्रकरण गावातील वडीलधाऱ्या लोकांपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी पुजाऱ्याच्या बाजूने निकाल दिला. 

ही जमीन आपलीच आहे, हे दाखवण्यासाठी पुजाऱ्याने त्या जमिनीवर बाजरीच्या पेंड्या ठेवल्या. तरीही आरोपींनी त्याठिकाणी झोपडी बांधण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. 

Positive Story : रातोरात बदललं आयुष्य; आता 'बाबा का ढाबा' झोमॅटोवर​

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पुजाऱ्याने म्हटले आहे की, बुधवारी (ता.७) सहाजणांनी बाजरीच्या पेंड्या पेटवून देत पुजाऱ्याच्या अंगावरही पेट्रोल टाकले. या घटनेत भाजलेल्या पुजाऱ्याला जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी (ता.८) उपचारादरम्यान पुजाऱ्याचा मृत्यू झाला. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी हरजीलाल यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,  पुजाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी कैलाश मीनाला ताब्यात घेतले आहे. पुजाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये कैलास, शंकर, नमो मीना आणि अन्य तीन जणांचा उल्लेख केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple priest burnt alive over land dispute in Rajasthans Karauli