भावा, फक्त मोदींचीच हवा!; मॅच जिंकण्याची दहा कारणे! 

भावा, फक्त मोदींचीच हवा!; मॅच जिंकण्याची दहा कारणे! 

नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली.

विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या 'टीम भाजप'चे कॅप्टन नरेंद्र मोदींनी हक्काच्या 'हिंदी बेल्ट'प्रमाणेच पूर्व, ईशान्य, दक्षिण आणि पश्‍चिम भारतावरही विजयाचा ध्वज फडकावला, यामुळे भारतीय जनसागरात 2014 मध्ये उसळलेली 'मोदी' लाट यावेळेसही कायम राहिली. 

कशी झाली आजची मॅच..!

1. गुरुवारचा दिवस सत्ताधारी भाजपसाठी गूड न्यूज घेऊन आला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजप आणि मित्रपक्षांची विजयाच्या दिशेने घोडदौड कायम होती. मोदी नावाच्या 'सुपर मॅन'ने चौफेर फटकेबाजी करत धावांचा (जागांचा) अक्षरशः पाऊस पाडला. सत्तेचे 'हिंदी पीच' यंदाही भाजपला अनुकूल ठरले. सलामीवीर 'नमों'नी विरोधकांच्या आक्रमक गोलंदाजीला जशास तसे उत्तर दिले. 

2. 'यूपी'त मोदी योगी अन्‌ शहांची खेळी यशस्वी ठरली, तर कॉंग्रेसला त्रिफळाचित व्हावे लागले. शेवटपर्यंत धावाधाव करणारी अखिलेश आणि मायावतींची महाआघाडी अखेरच्या क्षणी 'रनआउट' झाली. दलित, मुस्लिम आणि यादव यांच्या मतांची एकगठ्ठा मोट बांधून सत्तेचा चषक मिळवू पाहणाऱ्या महाआघाडीला मोदी- शहांसमोर नमते घ्यावे लागले. 

3. मोदींनी 'शॉर्ट लेग'वरची दिल्ली, 'सिली मिड ऑफ' आणि 'मिड ऑन'वरील यूपी, मध्य प्रदेश आणि राजस्थानवरून मारलेला 'नमो शॉट' विरोधकांना सीमेपार घेऊन गेला. 'शॉर्ट मिड ऑफ'वरील महाराष्ट्र आणि 'एक्‍स्ट्रा कव्हर'वरील गुजरातवरूनही मोदींनी विजयाचे षटकार खेचले. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोरसारखे फिरकी गोलंदाजही गुजरातच्या स्टेडियममध्ये चमत्कार दाखवू शकले नाहीत. 'गली'तील पंजाबमध्ये मात्र कॉंग्रेसला मोदींचे अनेक फटके रोखण्यात यश आले.

4. महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेच्या युतीचे बाण कॉंग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीच्या जिव्हारी लागले. मोदी लाटेसमोर 'पवार फॅक्‍टर'ही निष्प्रभ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवारांच्या गुगलीवरही मोदींनी विजयी षट्‌कार खेचले. 

5. दक्षिणेकडे आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत या खेपेस चंद्रास्त पहायला मिळाला, 'विधानसभेच्या पीच'वर वायएसआर कॉंग्रेसने तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांना क्‍लीनबोल्ड केल्याने चंद्राबाबूंचे राष्ट्रीय खेळीतील आव्हानच संपुष्टात आले आहे.

6. 'मिड ऑन'वरील तेलंगणमध्येही तेलंगण राष्ट्र समितीचा बोलबाला पहायला मिळाला. आंध्रात लोकसभेच्या पीचवरही चंद्राबाबू नायडू सपशेल अपयशी ठरले. येथेही वायएसआर कॉंग्रेसने मुसंडी मारली.

7. 'मिड ऑफ'वरील कर्नाटकमध्ये 'नमो फॅक्‍टर' चालला. येथे कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची आघाडी भाजपला रोखू शकली नाही.

8. 'लॉंग ऑन'वरील तमिळनाडू आणि 'लॉंग ऑफ'वरील केरळच्या दिशेने मोदींनी केलेली फटकेबाजी रोखण्यात विरोधकांना काही प्रमाणात यश आले. तमिळनाडूत 'द्रमुक'ने, तर केरळमध्ये 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट' आणि 'लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट'ने चांगली फिल्डिंग करत सत्तेचे चेंडू रोखले. 

9. याखेपेस मोदींनी ईशान्येकडील 'डीप स्क्वेअर लेग'च्या दिशेनेही जोरदार फटकेबाजी केली, 'मिड विकेट'वर उभ्या असलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वेळी भाजपचा वारू रोखण्याचा जोरदार प्रयत्न केला; पण त्यांनाही यात फारसे यश मिळाले नाही. 'वायनाड'ने राहुल गांधींना हात दिल्याने कॉंग्रेसला दिलासा मिळाला. 

10. ममता आणि भाजपच्या लाथाळीत डावे निष्प्रभ झाल्याचे पहायला मिळाले. 'डिप मिड' विकेटवरील अरुणाचलच्या दिशेने गेलेले 'नमो शॉट्‌स' यशस्वी झाले. दहशतवाद्यांच्या खुनशी कारवायांमुळे नेहमीच अस्थिर राहणाऱ्या 'लॉंग स्टॉप'वरील जम्मू- काश्‍मीरवरून टोलावलेले मोदींचे हेलिकॉप्टर शॉट्‌सही सीमेपार गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com