जम्मू-काश्‍मीरमध्ये यंदा 132 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

यावर्षी मागील सात महिन्यांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ही गेल्या सात वर्षांत याच कालावधीतील सर्वाधिक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली

जम्मू - जम्मू-काश्‍मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 132 दहशतवादी ठार झाले असून, यामध्ये लष्करे तैयबाचा अबू दुजाना आणि हिज्बुल मुजाहिदीनमधील बुऱ्हाण वणीचा वारसदार सबजार अहमद भट यांच्यासह 6 म्होरक्‍यांचा समावेश असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

काश्‍मीरमध्ये दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दले आणि पोलिसांनी वेळोवेळी एकत्रितपणे शोधमोहीम राबवून या दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. यावर्षी मागील सात महिन्यांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ही गेल्या सात वर्षांत याच कालावधीतील सर्वाधिक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.

जुलैअखेर 115 दहशतवादी ठार झाले होते, तर तेव्हापासून 9 ऑगस्टअखेर आणखी 17 दहशतवादी ठार झाले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. यामध्ये लष्करे तैयबाच्या 38, हिज्बुलच्या 37 आणि अल कायदाशी संबंधित झाकीर मुसा गटाच्या 3 दहशतवाद्यांचा समावेश असून, उर्वरित 58 अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. प्रामुख्याने नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत अधिकांश दहशतवादी ठार झाले आहेत.

Web Title: terrorism jammu kashmir india