श्रीनगर: "बीएसएफ'च्या तळावर दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताच दहशतवादी विमानतळाच्या प्रांगणामधील एका इमारतीमध्ये घुसले. या परिसरात सध्या दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये धुमश्‍चक्री सुरु आहे. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर विमानतळाच्या दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे

नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तळावर आज (मंगळवार) पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. जवानांनी या हल्ल्यास तीव्र प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक अद्यापी सुरु आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन वा चार असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी बीएसएफच्या विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या तळावर हल्ला चढविला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताच दहशतवादी विमानतळाच्या प्रांगणामधील एका इमारतीमध्ये घुसले. या परिसरात सध्या दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये धुमश्‍चक्री सुरु आहे.

या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर विमानतळाच्या दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळावरील आज सकाळची सर्व उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. उड्डाणे रद्द झाल्याने या विमानतळावर पर्यटक रखडले आहेत.

हा भाग काश्‍मीरमधील सर्वांत कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागांपैकी एक आहे. या नागरी विमानतळाजवळच लष्कर व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणारा विमानतळही आहे. याशिवाय बीएसएफ व केंद्रीय राखीव पोलिस दलाची प्रशिक्षण केंद्रेही या हल्ल्याच्या ठिकाणापासून नजीकच आहेत.

Web Title: Terrorists attack BSF camp near Srinagar international airport