अफझलच्या बदल्यासाठीच नगरोटातील हल्ला?

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

श्रीनगर/ नवी दिल्ली - जम्मू- काश्‍मीरमधील नगरोटा येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध होत असताना, हा हल्ला करणाऱ्या तीन आत्मघाती दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांकडून काही ऊर्दू पत्रकेही हस्तगत करण्यात आली असून त्यामध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरूच्या नावाचा समावेश आहे. अफझलच्या फाशीचा बदला घेण्यासाठीच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा असा संशय  वर्तविला जात आहे.

याच दहशतवाद्यांकडून काही धोकादायक रसायनेही जप्त करण्यात आली असून, अशाच प्रकारच्या रसायनांचा उरी हल्ल्यादरम्यान वापर करण्यात आला होता. रासायनिक हल्ला करण्याच्या उद्देशानेच या दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसखोरी केली असावी, असाही संशय आहे. चकमकीमध्ये ठार झालेले दहशतवादी ‘जैशे महंमद’ या संघटनेशी संबंधित असावेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी दहशतवादी हे आता काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे.

सीमेपलीकडून संदेश
नगरोटामधील हल्लेखोर दहशतवाद्यांना सीमेपलीकडून सूचना दिल्या जात होत्या. गुप्तचर संस्थांनी ४ कॉल ट्रेस केले असून, यामध्ये मध्यस्थ दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देत असल्याचे आढळून आले. दहशतवाद्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले बहुतांश साहित्य भारतीय बनावटीचे आहे. दहशतवाद्यांनी परिधान केलेल्या पोशाखावरती लोकल टॅग होता, यामुळे या दहशतवाद्यांना अंतर्गत मदत झाल्याचे उघड झाले.

शोधमोहीम सुरू
लष्कर छावणी परिसरामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविली जात असून, संपूर्ण परिसराला घेराओ घालण्यात आला आहे. लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, लष्कराच्या छावणी भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

Web Title: terrorists attack on Indian army camp