esakal | ‘तालिबानस्ताना’त आता अन्नसंकट
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

‘तालिबानस्ताना’त आता अन्नसंकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल: तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानात आता अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी या महिन्यानंतर अफगाणिस्तानात भूकबळीची संख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे गरजू लोकांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी अफगाणिस्तानला तातडीने २० कोटी डॉलरची गरज आहे. सध्याची अफगाणिस्तानची स्थिती पाहता आगामी काळात अन्नधान्याची भीषण टंचाई जाणवणार असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

संयुक्त राष्ट्राचे स्थानिक समन्वयक रमीज अलाकबारोव म्हणाले की, देशातील एक तृतीयांश लोकसंख्या आणीबाणीचा सामना करत आहेत किंवा त्यांच्या खाद्य सुरक्षेवर टांगती तलवार आहे. आता हिवाळा येत असून दुष्काळही पडलेला आहे. लोकांना भूकबळीपासून वाचवायचे असेल तर अफगाणिस्तानला पैशाची गरज भासणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत काही आठवड्यांपासून हजारो नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. परंतु अजूनही मोठी लोकसंख्या पुरेशा अन्नापासून वंचित राहत आहे. ते म्हणाले की, हिवाळा जवळ आला आहे. अशा स्थितीत अफगणिस्तानाला आणखी निधी दिला नाही तर देशातील अन्न सप्टेंबरअखेरपर्यंत संपेल. खाद्यान्नाची गरज भागवण्यासाठी २० कोटी डॉलरची गरज आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिका सैनिक परतल्यानंतर आता तालिबानकडून राज्य चालवले जात आहे. परंतु आर्थिक आघाडीवर कोणतेच नियोजन नसल्याने अफगाणिस्तानाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल, असे अनेक देशांचे मत आहे. अन्नाच्या समस्येबरोबरच येथील सरकारी कर्मचारी वेतन नसतानाही काम करत आहेत. चलनाचे अवमूल्यन झाले आहे. रोम येथील जागतिक अन्न कार्यक्रमातंर्गत सादर केलेल्या अहवालात म्हटले की, ३९ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात १४ दशलक्ष लोकांसमोर दोनवेळच्या अन्नाचे संकट उभे राहिले आहे. तीन वर्षात दुसऱ्यांदा दुष्काळ पडला आहे. तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागाला अगोदरपासूनच दुष्काळाच्या झळा बसत आहेत.

हेही वाचा: न्यूयॉर्कला 'इडा'चा तडाखा, 41 जणांचा मृत्यु

तीनैपकी एका अफगाण नागरिकांना अन्न कोठून मिळेल, याचा थांगपत्ता नाही. पाच वर्षापर्यंतच्या सर्व मुलांपैकी निम्मे मुले ही पुढील वर्षापर्यंत कुपोषित होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचे नागरिक दररोज मुलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत.

- ॲन्टानिओ गुटेरेस,

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस

तालिबानचे अन्यायकारक फर्मान

तालिबानचे दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला तरी देश कसा सांभाळेल, यावरून तर्कवितर्क लावले जात आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई केली गेली आहे. तसेच गाणे ऐकणे आणि फोटो काढण्यावरही बंदी घातली आहे. देशात चांगले सरकार चालवू, अशी हमी तालिबानी नेत्यांनी दिली आहे. मुला-मुलींसाठी शाळा सुरू करण्याविषयीही त्यांनी मत मांडले आहे.

loading image
go to top