भाजपमधून बाहेर पडल्याने कोणताही फरक पडला नाही; सिद्धूंबाबत पुरींचे मत

भाजपमधून बाहेर पडल्याने कोणताही फरक पडला नाही; सिद्धूंबाबत पुरींचे मत

अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, गुरुदासपूरचे खासदार सुनील जाखड यांनी प्रश्‍नांना न टाळता संवाद साधला. 

पंजाब सरकारने केंद्राच्या योजनांची नावे बदलली 
- या निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते? 

पुरी : 2014 मध्ये विकासाचे आश्‍वासन भाजपने दिले होते. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास लोक स्वतः बघत आहेत. त्यामुळे या वेळी केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार येणार हे निश्‍चित. 2014 मध्ये राज्यात अकाली दल-भाजप सरकारविरुद्ध अँटी इन्कंबसी होती. आता कॉंग्रेस सरकारविरुद्ध आहे. पंजाबमध्ये भाजप तिन्ही जागा जिंकणार. 

- तुमच्यावर बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होत आहे. जेटली यांना याच मुद्याने फटका बसला होता. 

पुरी : निवडणूक कोणत्याही एका मुद्यावर नसते. खासदार गुरुजितसिंग ओखला यांनी काहीही कामे केली नाहीत. या माझ्या संकल्पपत्रातील योजना पुढच्या सहा महिन्यांत मी केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरू करणार आहे. मी बाहेरचा कसा ठरू शकतो. फाळणीनंतर माझे आजोबा प्रथम अमृतसरलाच आले. तेथून माझे वडील दिल्लीला गेले. अमृतसर ही जगातील कोणत्याही शीखधर्मीयाची भूमी आहे. अमृतसरमध्ये पत्रकार स्थानिक राजकारणातील पार्टीच बनतात. त्यांनी काही दाखविल्याने- लिहिल्याने मला फरक पडत नाही. हे माझे धर्मस्थान आहे व कर्मस्थानही आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते माझा प्रचार करत आहेतच. येथे भाजपने 1999 ते 2009 असे वर्चस्व गाजविले आहे. 

- पण ते वर्चस्व गाजविणारे नवज्योतसिंग सिद्धू कॉंग्रेसमध्ये गेले. 

पुरी : भाजप हा असा पक्ष आहे, की जेथे कोणी एकादा जाण्याने येण्याने फारसा फरक पडत नाही. मी अमृतसरमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून केलेली कामे बोलत आहेत. शिवाय भाजप कार्यकर्त्यांचेही सहकार्य आहे. 

- तसे दिसत नाही. गौतम गंभीर यांचा कालचा रोड शो फ्लॉप झाला व ते गाडीत बसून रागाने निघून गेले.

पुरी : कालच स्मृती इराणी यांची सभा किती मोठी झाली हे पाहा. 

- पंजाब सरकारबद्दल लोकांमध्ये चांगली भावना आढळते 

पुरी : अजिबात नाही. मोदी सरकारने व माझ्या मंत्रालयाने ज्या ज्या योजना दिल्या त्यांची नावे अमरिंदर सरकारने बदलली. प्रत्येक योजनेत अडथळे आणले. पंतप्रधान निवास योजनेत मी अमृतसरसाठी 3 लाख घरे मंजूर केली. यांनी योजनेचे नाव व स्वरूपच बदलले. आयुष्मान भारत योजनेचेही तसेच. तुम्हाला केंद्र पैसा देत असेल, तर गैरव्यवस्थापन कसे चालेल? पण विकास न करताच त्याबद्दल बोलणे ही कॉंग्रेसची ही जुनी संस्कृती आहे.

- केंद्राच्या कोणत्या योजना पंजाबला लाभदायक ठरल्या? 

पुरी ः मी केंद्राच्या किमान 5 योजनांसाठी अमृतसरला प्राधान्य दिले. सुवर्ण मंदिराच्या परिसरातील हेरिटेज वॉक प्रकल्पासाठी माझ्या मंत्रालयाने 70 कोटींचा निधी दिला. जालियनवाला बाग परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 20 कोटी मंजूर केले. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एकट्या पंजाबला 1600 कोटींचा निधी दिला. अमृतसरमध्ये मोनोरेलचा प्रस्ताव असाच धूळ खात पडला आहे. राज्य सरकारचे सहकार्यच मिळत नाही. शहरात भत्तावाले गेट भागात कचऱ्याचा मोठा ढिगारा होता. त्याबाबत कडक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. 

महाराष्ट्राचे जावई

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याप्रमाणेच पुरी हेही महाराष्ट्राचे जावई आहेत. पुरी यांच्या यंदाच्या निवडणूक व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या टीममध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांचा मोठा सहभाग आहे. लक्ष्मी पुरी या मूळच्या महाराष्ट्रातील. रत्नागिरीजवळ त्यांचे गाव आहे. त्याही परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होत्या. त्या मराठी चांगले बोलतात. फार पूर्वी "सकाळ'मध्ये आपली एक मुलाखत छापून आली होती. त्यानंतर आपली आई अनेक दिवस तो अंक उशाखाली ठेवत असे, अशी आठवण त्यांनी सांगितली. 

मोदींचा प्रयत्न जनरल मोदी बनण्याकडे : जाखड 

प्रश्न : पंजाबमध्ये राष्ट्रवाद हा मुद्दा आहे का?

जाखड : राष्ट्रवाद ही प्रदर्शनाची व श्रेय लाटण्याची गोष्ट नाही. जेव्हा प्रश्न विचारण्यानेही एखाद्याला राग येतो तेव्हा त्याची मूळ वृत्तीच हुकूमशाहीकडे असल्याचे समजावे. शूर जवानांचे बालाकोटमधील श्रेय मोदी स्वतःकडे घेण्याचा जो प्रयत्न करीत आहेत तो निंदनीय असून, मोदींचा जनरल मोदी होण्याकडील प्रयत्न नागरिकांनी वेळीच ओळखायला हवा; अन्यथा पाकिस्तानला नावे ठेवता ठेवता भारतावरच पुढच्या पाच वर्षांत पश्‍चात्तापाची वेळ येईल. पुलवामातील हल्ला संशयास्पद होता. या हल्ल्यानंतर पंजाबमधील एका हुतात्मा जवानाच्या घरी सांत्वनासाठी गेलो तेव्हा समजले, की त्याचे पार्थिव रात्रभर घरी आले नव्हते. त्याच्या वडिलांनी सांगितले की, सर्व पार्थिव दिल्लीला नेण्यात आले आहेत. का तर पंतप्रधानांना तेथे फोटोसेशन करायचे होते. हे किती संतापजनक आहे. 

प्रश्न : पंतप्रधानांवर कॉंग्रेस नेत्यांनी केलेली टीका कॉंग्रेसला भोवणार का? 

जाखड ः देशाचे पंतप्रधान असून, त्यांच्याबद्दल बोलताना भाषेची मर्यादा पाळायलाच हवी. पण, मोदींची प्रचारातील भाषा काय सांगते? भूतकाळातील गरिबीचे भांडवल पंतप्रधानपदावरील व्यक्तीने या पद्धतीने करायचे नसते. लालबहादूर शास्त्रींपासून इंद्रकुमार गुजराल यांनीही कधी तसे केले नाही. मोदींनी राजीव गांधींवर हीन आरोप करून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालविली. सर्वत्र मोदीच हवेत, तर गुरुदासपूरमध्ये चित्रपट ताऱ्याचा आसरा त्यांना का घ्यावा लागला. मोदी हे संघाचे फेल प्रॉडक्‍ट आहे व संघाने आता सभ्य मॉडेल शोधावे. लोकसभाध्यक्षांचा आदरच आहे. मात्र, गेली पाच वर्षे संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांबाबत पक्षपात केला गेला, हे खरे नाही का? 

प्रश्न : सतराव्या लोकसभेचे चित्र आपण कसे पाहता?

जाखड ः पंजाबबद्दल बोलायचे, तर कॉंग्रेसची स्थिती मजबूत आहे. किमान 10 जागा आम्ही निश्‍चित जिंकू, असे जाणवते. अमली पदार्थांचा प्रश्न आहे. पण, विरोधात असताना अकाली दल-भाजप हा प्रश्‍नच नसल्याचा दावा करीत त्यांना आता 75 टक्के पंजाबला अमली पदार्थांचा विळखा बसल्याचा साक्षात्कार कसा झाला, हे समजायला मार्ग नाही. राज्य सरकारने व्यसनमुक्ती केंद्रे, जनजागरण मोहीम राबविली असून, त्याचे परिणामही दिसत आहेत. पण, या केंद्रांतून बाहेर पडणाऱ्या युवकांच्या हाताला काम नसेल, तर ते पुन्हा व्यसनांकडे वळण्याचा धोका असतो. त्यादृष्टीनेही आम्ही प्रयत्नशील आहोत. 

याशिवाय शहापूर धरण, पेप्सीचा कारखाना, दोन वैद्यकीय महाविद्यालये, तीन महाविद्यालये, दोन साखर कारखान्यांची गाळपक्षमता वाढविणे ही कामे गुरुदासपूर भागात मार्गी लावली आहेत. शिवाय, राज्य सरकारने या भागात केलेली कामे अनेक आहेत. त्यातूनच आपण पुन्हा विजयी होणार. 

प्रश्न :  कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचीही भरपूर चर्चा आहे. 

जाखड : गटबाजी अजिबात नाही. नवज्योतसिंग सिद्धू माझ्या प्रचारासाठी येतात म्हणजे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची नाराजी आहे, असे मानणे चूक आहे. पंजाब कॉंग्रेस एकसंध होती व राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com