जिथे भाजपची सत्ता, तिेथे 'जंगल राज' - मायावती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

'ज्या राज्यात भाजप सत्तेत आहे, तिथे 'जंगल राज' म्हणजेच मनमानी कारभार चालतो. महिलांची सुरक्षितता त्यांच्यासाठी गौण मुद्दा असून त्याकडे ते दुर्लक्ष करताना दिसतात,' असाही आरोप मायावतींनी यावेळी केला.

लखनौ : 'ज्या राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, तिथे 'जंगल राज' चालते' असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी (ता. 6) केले. बिहारमधील मुझफ्फरपूर व उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील आश्रम शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही व हा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, यावर बोलताना मायावती यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले.  

लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्यानंतर येथील 24 मुलींची आश्रम शाळेतून सुटका करण्यात आली, याशिवाय 18 मुली अजूनही बेपत्ता आहेत. राज्यशासनाचे अनुदान असणाऱ्या शाळेत असे निंदनीय प्रकार घडल्यामुळे शासनालाही लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे.  

'उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील आश्रमशाळेतील या लज्जास्पद प्रकारामुळे व भाजप सरकारमुळे उत्तर प्रदेशात किती अराजकता आहे व महिला किती असुरक्षित आहेत याची जाणीव होते. हे दोनही प्रकार देशासाठी शरमेची व चिंतेची बाब आहेत. या घटनेवर कारवाई लवकरच व्हावी, तसेच प्रकरण दाबून ठेवू नये', असे या वेळी मायावती यांनी सांगितले. 

'ज्या राज्यात भाजप सत्तेत आहे, तिथे 'जंगल राज' म्हणजेच मनमानी कारभार चालतो. महिलांची सुरक्षितता त्यांच्यासाठी गौण मुद्दा असून त्याकडे ते दुर्लक्ष करताना दिसतात,' असाही आरोप मायावतींनी यावेळी केला. 

Web Title: there is jungle raj in bjp ruled states