त्यांचा माओवादी चळवळीशी संबंध ऐकिवात नाही : पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : कोरेगाव भीमामधील हिंसाचारप्रकरणी माओवाद्यांशी संबंधांवरून डाव्या विचारवंतांना झालेल्या अटकेचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटले आहेत. "महाराष्ट्रात अटक झालेल्यांना मी व्यक्तिशः ओळखतो. ते डाव्या विचारसरणीचे असले तरी त्यांचा माओवादी चळवळीशी संबंध असल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अटक सत्रावर सूचक प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

पुणे पोलिसांनी काल (ता. 28) घातलेल्या छाप्यांमध्ये हैदराबादचे कवी पी. वरवरा राव, मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, अरुण परेरा, दिल्लीतील पत्रकार गौतम नवलाखा आणि मुंबईतील वेरनोन गोन्साल्विस यांना अटक केली होती. 
शरद पवार यांनीही या अटकेवर आडवळणाने साशंकता व्यक्त केली. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की अटकेतील काहींना मी ओळखतो. ते कार्यकर्ते आहेत, ते डाव्या विचारसरणीचे आहेत; पण त्यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचे मी कधीही ऐकलेले नाही. मी त्यांच्या घरी जाईन, कुटुंबीयांशी- शेजाऱ्यांशी बोलून जाणून घेईन. माओवादी चळवळीशी संबंध असल्यावरून सरकार आणि पोलिस यंत्रणेने त्यांना अटक करणे दुर्दैवी आहे. 

सनातन संस्थेविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटक पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, काही संघटना या हत्येशी संबंधित असल्याची माहितीही पुढे आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असू शकतो, असा समज महाराष्ट्रात पसरला आहे. 

Web Title: They have no connection with Maoist movement says Pawar