सोनेरी पिंजऱ्यातील आमदारांनी चिन्नमांच्या अडचणी वाढविल्या

वॉल्टर स्कॉट : सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

चेन्नई : "अण्णा द्रमुक'च्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी आपल्या गोटातील आमदार फुटू नयेत, म्हणून त्यांना पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टच्या सोनेरी पिंजऱ्यात कैद केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या गटाने याच मुद्यावरून चिन्नमांवर टीकेचा भडिमार केला. मद्रास उच्च न्यायालयानेही यावर चिंता व्यक्त करत आमदारांना डांबून ठेवून त्यांना जर खरोखरच अन्न आणि पाणी दिले जात नसेल तर ही धक्कादायक बाब असल्याचे नमूद केले.

तत्पूर्वी, राज्य सरकारने गुरुवारी हा मुद्दा न्यायालयात उपस्थित होताच सर्व आमदार त्यांच्या निवासस्थानी असल्याचा दावा केला होता. आज याच मुद्यावरून राज्य सरकारने यू टर्न घेतल्याने शशिकला गटाचे पितळ उघडे पडले.
या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी शशिकलांनी आमदारांना डांबून ठेवल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

राज्यपालांनी मुख्य सचिव गिरिजा वैद्यनाथन, पोलिस महासंचालक टी. के. राजेंद्रन, चेन्नईचे पोलिस आयुक्त एस. जॉर्ज यांच्याशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर "अण्णा द्रमुक'च्या सरचिटणीस शशिकला यांनीही विद्यासागर राव यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी मात्र यावर "वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. यामुळे सध्यातरी राजकीय अनिश्‍चिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मधुसूदन यांची हकालपट्टी
अण्णा द्रमुकचे नेते ई. मधुसूदन यांनी आज शशिकलांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्ष मूल्ये आणि शिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शशिकला यांनाच मी पक्षातून हाकलले असल्याने त्या पुन्हा माझी हकालपट्टी करू शकत नाहीत, असे मधुसूदन यांनी म्हटले आहे.

दिवसभरात
तमिळनाडूतील कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा
शशिकलांविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी नाही
राज्यपालांची पोलिस महासंचालक राजेंद्रन यांच्याशी चर्चा
आमदारांनी स्वखुशीने फोन बंद केल्याचा शशिकला गटाचा दावा
आमदारांबाबत शपथपत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
"गोल्डन बे रिसॉर्ट'ला पोलिस भेट देण्याची शक्‍यता
मधुसूदन यांची शशिकलांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
अण्णा द्रमुकचे नेते ई.पोन्नूस्वामी यांचा पनीरसेल्वम यांना पाठिंबा
कोंडण्यात आल्याचा दावा आमदारांनी फेटाळला
शशिकलांनी पोएस गार्डन येथे समर्थक आमदारांची घेतली बैठक

Web Title: those mlas add to problems of chinnamma