हिमाचल प्रदेश: तलावातील हजारो मासे पाण्याबाहेर मृतावस्थेत!

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

येथील विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या रेवलसर तलावातील हजारो मासे बुधवारी संध्याकाळी पाण्याबाहेर मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

मंडी (हिमाचल प्रदेश) - येथील विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या रेवलसर तलावातील हजारो मासे बुधवारी संध्याकाळी पाण्याबाहेर मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसात तलावातील पाण्याच्या रंगात अचानक बदल आढळून आला होता. पाण्यातील मासे तडपडत असल्याचेही दिसत होते. तर काही भागातील पाणी कमी झाल्याने तलावाचा तळही दिसत होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तज्ज्ञांच्या मते मासे मृत होण्याची अनेक कारणे आहेत. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होणे हे प्रमुख असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शिवाय पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे. तलावाच्या परिसरात गटारांची व्यवस्था नसल्याने परिसरातील घरातून गटाराचे पाणी तलावात झिरपत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

अतिरिक्त उपायुक्त हरिकेश मीना घटनास्थळी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, "तलावार माशांना खाण्यासाठी पदार्थ टाकण्यावर संपूर्णपणे बंदी आणण्यात येणार आहे. तलावाला मोठे धार्मिक महत्व असल्याने याशिवाय अन्य काही उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.' परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी मत्स्य विभागासह प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्यांनी पाण्यातील नमुने गोळा करून तपासणीसाठी नेले आहेत.

Web Title: Thousands of fishes found dead in Rewalsar Lake