विधान परिषद रणधुमाळी; रिंगणातील तीन प्रमुख उमेदवार कोट्यधीश I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद रणधुमाळी; रिंगणातील तीन प्रमुख उमेदवार कोट्यधीश

निवडणूक रिंगणात असलेल्या १० उमेदवारांनी अर्जासोबत मालमत्तेसंबंधी प्रतिज्ञापत्र दिले आहे.

विधान परिषद रणधुमाळी; रिंगणातील तीन प्रमुख उमेदवार कोट्यधीश

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे घोषित केली आहे. त्यानुसार भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ, काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १० उमेदवारांनी अर्जासोबत मालमत्तेसंबंधी प्रतिज्ञापत्र दिले आहे.

भाजप उमेदवार कवटगीमठ यांनी स्वतःकडे २ कोटी ३१ लाख जंगम आणि ३.४९ कोटी किंमतीची स्थावर मालमत्ता, पत्नी राजेश्वरींच्या नावाने ३.९० कोटी जंगम व ६.५६ कोटी किंमतीची स्थावर मालमत्ता, मुलगी सुश्मिताच्या नावावर ३.१७ लाख आणि मुलगा शरदच्या नावावर २.१५ लाख किमतीची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे ३ लाख रोख, २९.९९ लाख बचत खात्यात आणि १३.५० लाख रुपये ठेव स्वरुपात आहेत. विविध ठिकाणी १.६८ लाख किंमतीचे शेअर्स असून ५१.१० लाख किंमतीच्या दोन मोटारी, २७.४१ लाख किंमतीचे दागिने असून २७ लाखाचे कर्ज आहे. पत्नी राजेश्वरींच्या नावाने ५ लाख रोख, २.६२ कोटी किंमतीच्या विविध मोटारी, ४५.४३ लाख किंमतीचे दागिने असून आपल्यावर ४.६० कोटीचे कर्ज असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.

हेही वाचा: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

‌काँग्रेसचे उमेदवार हट्टीहोळी ३१.५ कोटींचे मालक आहेत. त्यात २०.६६ कोटी जंगम आणि १०.८४ कोटीची स्थावर मालमत्ता आहे. ५.७६ कोटीचे कर्ज असून राज्य सरकारला ४.१८ कोटी कर्ज भरणा शिल्लक आहे. बेळगाव तालुक्यातील मोदगेतील फार्महाऊसमध्ये ते राहत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते हर्षा शुगर्सचे व्यवस्थापक संचालक असून त्यांच्याकडे ४.४५ लाख, पत्नी नंदिनी यांच्या नावाने ३६,२०० रोख असल्याचे नमूद केले आहे. ७.३३ लाख किंमतीचे एक किलो सोने आणि १.२३ लाख किंमतीची दहा किलो चांदी (वडिलोपार्जित मालमत्ता) आहे. स्वतः खरेदी केलेले २६ लाख किंमतीचे ९४०.३१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पत्नीच्या नावाने १८.१२ लाख किंमतीचे सोन्याचे आणि १.४५ लाख किंमतीचे चांदीचे दागिने आहेत. पत्नी नंदिनी यांच्या नावाने ३२.४६ लाख रुपये आणि मुलगा धीरजच्या नावाने २.२९ लाख किंमतीची जंगम आणि १० कोटीची स्थावर मालमत्ता आहे. स्वतःच्या नावाने २६ लाख आणि १८.९४ लाख किंमतीच्या दोन मोटारी असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

‌अपक्ष जारकीहोळी यांच्याकडे १२.८४ कोटी जंगम आणि ३३.३० कोटी स्थावर मालमत्ता आहे. पत्नी संध्या यांच्या नावाने १.४५ कोटी जंगम आणि १.९३ कोटी स्थावर मालमत्ता आहे. वैयक्तिक १.४८ कोटींचे आणि पत्नीच्या नावाने अडीच कोटीचे कर्ज असून सरकारला २.३७ कोटी देणे शिल्लक आहे. त्यांच्याकडे १४.९५ लाख रोख, ५ किलो सोने, ८.३७ किलो सोन्याचे दागिने असून पत्नीच्या नावाने ३७ लाख किंमतीचे सोने आणि दागिने आहेत. मुलगी ऐश्वर्या, मुलगा आदित्य आणि आर्या यांच्या नावाने प्रत्येकी ८.९४ लाख किंमतीचे दागिने, ९६.८० लाख, ७१.३४ लाख किंमतीच्या दोन मोटारींसह एकूण सात मोटारी आहेत. पत्नीच्या नावाने ३० लाखाची मोटार असून पत्नीच्या नावाने अडीच कोटी, मुलगी ऐश्वर्या १२.१७ लाख आणि मुलगा आदित्य यांच्यावर १८.६१ लाखांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

हेही वाचा: संविधानाची मूल्ये जपायला हवीत; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

loading image
go to top