गडचिरोलीत विषारी दारूने घेतला तिघांचा बळी

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होण्याच्या दहा दिवसांआधीच विषारी दारूने तीन जणांचा बळी घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा पुरवठा केला जात असल्याने मोठी समस्या उद्‌भवली आहे

धानोरा (जि. गडचिरोली) - विषारी दारू प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 18) रात्री आठच्या सुमारास मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत सायगाव येथे घडली. उमेश बुधू मडकाम (वय 35, रा. सायगाव), जितेंद्र ऋषी दुगा (वय 20) रा. चिचेवाडा व तुळशीराम करंगामी, अशी मृतांची नावे आहेत. तुळशीराम करंगामी हा गडचिरोली पोलिस मुख्यालयातील श्वानपथकात कार्यरत होता.

धानोरा तालुक्‍यातील सायगाव या गावाचा समावेश कुरखेडा तालुक्‍यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत होतो. काल सायगाव येथे प्रभाकर सुंदरशहा मडकाम यांच्या मुलाच्या नामकरणविधीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर काही जण गावात एके ठिकाणी दारू पीत बसले होते. काही क्षणातच तिघांची प्रकृती बिघडली. त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उमेश बुधू मडकाम व जितेंद्र ऋषी दुगा यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. यातील तिसरा व्यक्ती तुळशीराम करंगामी याची प्रकृती गंभीर होती. त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, सायगाव हे गाव सुरसुंडीपासून अगदी जवळ आहे. सुरसुंडी येथे येत्या 2 एप्रिलला व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणारे शेषराव महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग उपस्थित राहणार आहेत. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होण्याच्या दहा दिवसांआधीच विषारी दारूने तीन जणांचा बळी घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा पुरवठा केला जात असल्याने मोठी समस्या उद्‌भवली आहे.

Web Title: three dead in gadchiroli due toxic alcohol