तीनशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत 

पीटीआय
Monday, 27 April 2020

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळपास तीनशे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत सज्ज बसले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळपास तीनशे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत सज्ज बसले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्करानेही गस्त यंत्रणा आणि घुसखोरीविरोधातील धोरण अधिक सक्षम केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिपा खोरे, अथमुकाम आणि दुदनियाल या भागांजवळ मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे लष्कराच्या गस्ती पथकांनाही अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याचीही शक्यता लक्षात घेऊन लष्करातर्फे हालचाली केल्या जात आहेत. लष्कराच्या गुप्तचरांनी दिलेल्या अहवालानुसार, सुमारे तीनशे दहशतवादी सीमेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास तयार बसले आहेत. यातील बहुतेक दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन आणि लष्करे तैयबा या संघटनांचे सदस्य आहेत. 

पाकिस्तानी सैन्याने आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या मदतीने दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी १६ तळ सक्रिय केले आहेत. ही संभाव्य घुसखोरी टाळण्यासाठी लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू हे परिस्थितीचा वारंवार आढावा घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

अतिरिक्त सावधगिरी 
कोरोनाचा संसर्ग झालेल्या दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने गस्त घालताना प्रचंड सावधगिरी बाळगण्याचे जवानांना आदेश देण्यात आले आहेत. संसर्गग्रस्त दहशतवादी भारतात प्रवेश करू नयेत म्हणून जवानांचे अतिरिक्त कडेही तैनात करण्याचा लष्कराचा विचार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred terrorists preparing to infiltrate India