काश्‍मिरात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन जवान हुतात्मा

पीटीआय
रविवार, 18 डिसेंबर 2016

काश्‍मिरात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला

श्रीनगर - भारतीय लष्कराच्या वाहनावर आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाले. जम्मू आणि काश्‍मीरमधील पाम्पोर गावात श्रीनगर-जम्मू महामार्गाजवळ हा हल्ला झाला. पाम्पोर हे गाव पुलवामा जिल्ह्यात आहे. 

काश्‍मिरात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला

श्रीनगर - भारतीय लष्कराच्या वाहनावर आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाले. जम्मू आणि काश्‍मीरमधील पाम्पोर गावात श्रीनगर-जम्मू महामार्गाजवळ हा हल्ला झाला. पाम्पोर हे गाव पुलवामा जिल्ह्यात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी पाम्पोरमधील कादलाबल येथे गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी जम्मूहून श्रीनगरला जात असलेल्या लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहन ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर गोळी लागूनही वाहनचालकाने गाडी तशीच पुढे नेल्याने आणखी हानी टळल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहनातील बहुतेक जवान हे सुटीवरून परतत होते, अथवा नव्या ठिकाणी तैनात होण्यासाठी जात होते. त्यांच्याकडे फारशी शस्त्रे नव्हती. हल्ल्याच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असल्याने जवानांनी गोळीबार न करता केवळ बचाव केला. हल्ल्यानंतर दहशतवादी तातडीने पळून गेले. मात्र, जवानांनी काही वेळातच शोध मोहीम सुरू केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जवानांनी आसपासच्या गावांमधील घरांमध्येही शोध घेतला. हल्ल्यानंतर जखमी जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले; मात्र त्यांतील तीन जवानांना हौतात्म्य आले. वाहनचालकासह दोन जवानांवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दहशतवाद्यांनी दुचाकीवरून येत हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र, याबाबत निश्‍चित माहिती मिळाली नसून, दहशतवाद्यांची संख्याही अद्याप समजलेली नाही. या वर्षात दहशतवाद्यांनी श्रीनगर-जम्मू महामार्गावरील गावांमध्ये एकूण पाच हल्ले केले आहेत.

पाकिस्तानबरोबरील तणावात वाढ झाल्याने यंदाच्या वर्षात काश्‍मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पठाणकोट, उरी आणि नगरोटा या लष्कराच्या तीन प्रमुख ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचे पाठबळ होते, असा भारताचा थेट आरोप आहे. 

ई सकाळ प्रतिक्रिया
दहशतवाद्यांना पाकिस्तानचे पाठबळ तर आहेच, शिवाय काश्‍मीरमधील फुटीरतावादीही त्यांना सहभागी आहेत. त्यांच्यामुळे तेथील सामान्य नागरिकांना निष्कारण हिंसाचाराला बळी पडावे लागत आहे. 
- सूर्याजी सातारकर, वाचक

वादग्रस्त मुद्यावर तोडगा काढण्यासाठी हिंसाचार कधीच उपयुक्त ठरणार नाही. उलट यामुळे लोकांनाच त्रास सहन करावा लागणार आहे. हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबांप्रती मला सहानुभूती वाटते.
- मेहबूबा मुफ्ती, जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री

सुरक्षा दलाचे नुकसान पाहता हे एक सर्वात वाईट वर्ष गेले. 
- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री 

Web Title: Three soldiers killed in militant attack on army convoy in Kashmir's Pampore