'टिकटॉक', 'हॅलो'चा डाटा होणार सेव्ह!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

- 'टिकटॉक', 'हॅलो'चा डेटा भारतातच होणार जतन
-  डेटा सेंटरसाठी पर्यायांची चाचपणी सुरू
- बाइटडान्स'ची माहिती 

नवी दिल्ली ः "टिकटॉक' आणि "हॅलो' ऍपच्या वापरकर्त्यांचा डेटा भारतातच जतन करण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांची चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती "बाइटडान्स' या कंपनीने रविवारी दिली. 

टिकटॉक व हॅलो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या भारतीयांची माहिती सध्या अमेरिका व सिंगापूरमधील डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. मात्र, हा डेटा देशातच जतन करावा, अशी भारत सरकारची भूमिका आहे. त्यादृष्टीने भारतात स्वतंत्र व सुरक्षित डेटा सेंटर निर्माण करण्यासाठी कंपनीकडून योग्य ती पावले उचलली जात असल्याचे
"बाइटडान्स'ने वृत्तसंस्थेला पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, टिकटॉक व हॅलोच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर केंद्राने संबंधित कंपनीला नोटीस पाठवून यावर 22 जुलैपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या ऍपवर बंदी घालण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. 

डेटा सेंटरसाठी लागणार 6 ते 18 महिने 
डेटा स्थानिकीकरणासाठी "बाइटडान्स'ने भारतातील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू केली असून, स्थानिक डेटा सेंटर अस्तित्वात आल्यानंतर त्यात प्रत्यक्ष माहिती साठवण्यास सुरवात होईल. पण, या प्रक्रियेसाठी साधारणतः 6 ते 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

वादाची पार्श्वभूमी 
"टिकटॉक'मार्फत अश्‍लील व अनुचित माहितीचा प्रसार होत असल्याने या ऍपवर सरकारने बंदी घालावी, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात केंद्राला दिले होते. मात्र, नंतर ते मागे घेण्यात आल्याने हे ऍप पुन्हा उपलब्ध झाले. दरम्यान, या ऍपद्वारे बेकायदा माहिती गोळा केली जात असून, त्याचा वापर चीनकडून होण्याची शक्‍यता असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी लोकसभेत केला होता. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याचे त्यांनी नमूद केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TikTok and hello Seeks Response Around Data Privacy and Age Limits